लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही चार ते पाच वर्षांपासूनचे कामे अपूर्ण असल्याबद्दल समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. लवकरच कामांना भेटी देऊन पाहणी करून खात्री करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
समाज कल्याण समितीची सभा सभापती सुनीता रामदास चारोस्कर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी घेण्यात आली. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. व्ही. डी. गर्जे यांनी योजनांची माहिती व आढावा सादर केला. त्यात समाज कल्याणमार्फत राबविल्या जाणा-या ३ टक्के वृद्ध कलावंत मानधन, आंतरजातीय विवाह योजना व अनु. जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, अपंग शिष्यवृत्ती, शालेय शिष्यवृत्ती योजनांचा आढावा घेण्यात आला. चालू वर्षांसाठी २० टक्के जि. प. सेसमधून मागासवर्गीय शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप तसेच मागासवर्गीय बेरोजगारांना व्यवसायासाठी चारचाकी वाहने पुरविण्याच्या योजना घेण्यात आली असून, लाभार्थ्यांनी १५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच दिव्यांगासाठी घरकुल योजना व दिव्यांगांना आवश्यक साधनसामग्री घेण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आलेले आहे.दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत चालू वर्षी प्राप्त होणा-या निधीनुसार प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचना सहायक गट विकास अधिका-यांना देण्यात आल्या असून, अपूर्ण असलेल्या कामांचा तालुकास्तरावर आढावा घेण्यात यावा व तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. काम खरोखर झाले अथवा नाही, याची खात्री करण्यासाठी दलित वस्तीतील कामांची पाहणी करण्यात येणार असल्याचे चारोस्कर यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांतील अपंग कल्याणसाठी प्राप्त झालेला निधी व जिल्हा परिषद सेसमधून करण्यात आलेली तरतुदीतून अखर्चित राहिलेला निधी जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस हिरामण खोसकर, सुरेश कमानकर, यशवंत शिरसाठ, कन्हू गायकवाड, ज्योती जाधव, रोहिणी गावित, शोभा कडाळे, वनिता शिंदे, विद्या पाटील उपस्थित होते.