त्र्यंबकेश्वर : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी तालुक्यातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच राहावे असे महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्र्यंबकेश्वर येथील तहसीलदार कार्यालयातील सभागृहात आढावा बैठकीप्रसंगी केले.यावेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे, नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, पेठ-त्र्यंबकचे उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, इगतपुरीच्या तहसीलदार अर्चना पागिरे, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, इगतपुरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड उपस्थित होत्या.सध्या सर्वत्र कोरोना कोविड-१९ या विषाणूने थैमान घातले आहे. भारताबरोबर महाराष्ट्रातदेखील या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या लॉकडाउनच्या काळात स्थलांतर न करता जेथे आहे तेथेच सुरक्षित राहा. स्थलांतर करून नाहक गैरसमजाला कारणीभूत होऊ नका. यासाठी बदली जरी जवळपास असली आपण रोज अपडाउन करू शकतो, एरवी ठीक असले तरीसध्याच्या काळात मुख्यालयी राहणेच गरजेचे आहे. याकरिता अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी राहावे असे आवाहन वजा आदेश झिरवाळ यांनी केले.-------------------------विधानसभा उपाध्यक्ष यांच्या आढावा बैठकीसाठी त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, परंतु बैठक संपल्यानंतर उपाध्यक्ष यांच्या हस्ते विविध किट वाटपप्रसंगी फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणालाच भान राहिले नाही. पर्यायाने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. शासकीय अधिकारी यांची आढावा बैठक असतानाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी तहसील कार्यालयात आल्याने सामजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन झाले.