नाशिक : संपूर्ण राज्यात गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी केली जाणार आहे. केवळ वापरावरच नव्हे तर निर्मिती आणि खरेदी-विक्रीही कायद्यानुसार बंद केली जाणार असल्याने या बंदीबाबत अधिकाºयांनी व्यापक जनजागृती मोहीम राबविली पाहिजे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले. नाशिकरोड येथील जलविज्ञान संशोधन प्रबोधिनी येथे पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि पर्यावरण विभागाचे सचिव सतीश गवई तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अलबन्नग, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन आदी उपस्थित होते. प्लॅस्टिकबंदी धोरण राबविण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कदम म्हणाले, केवळ शासनाने निर्णय घेऊन चालणार नाही, त्यात लोकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. प्लॅस्टिकमुक्त समाज निर्माण करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रत्येक विभागाने प्लॅस्टिकमुक्तीच्या योजना, उपक्रम राबविले पाहिजे. काही अभिनव कल्पना असतील तर त्यांचा अवलंब केला पाहिजे. विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला पाहिजे. प्लॅस्टिकचे काय दुष्परिणाम होतात याबाबत समाजातील प्रत्येक घटकाला जाऊन सांगितले पाहिजे. त्यांनाही प्लॅस्टिकबंदी मोहिमेची माहिती करून दिली पाहिजे, असेही कदम म्हणाले. प्लॅस्टिकबंदी करताना सर्व अधिकाºयांच्या सूचना आणि दृष्टिकोन जाणून घेतला जात आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच कायदा आहे की जो विधिमंडळात संमत होण्यापूर्वी नागरिकांकडून त्याबाबतची मते जाणून घेतली जात आहेत. सर्वसाधारणपणे कायदा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी व्हावी असे अपेक्षित असते; परंतु बंदी कशी असावी आणि उपायोजना काय हव्यात या सूचना अधिकारी, सर्वसामान्यांकडून घेण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे आपण या कायद्याचा भाग आहोत याची जाणीव सर्वसामान्यांना होऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी ते प्रोत्साहित होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकानेच प्लॅस्टिकबंदीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. बंदी लागू करताना कोणताही राजकीय पक्ष, व्यक्ती आडवी येत असेल तर नियमानुसार शासकीय कामात अडथळा आणला म्हणून त्याच्यावर कारवाई करण्याचा सल्लाही त्यांनी अधिकाºयांना दिला. काचेचे ग्लास, फुलांचा गुच्छ प्लॅस्टिकबंदी धोरण ठरविण्यासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्रिमहोदय, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्यांच्या टेबलवर काचेचे ग्लास आणि जग ठेवण्यात आले होते. फुलांचे गुच्छ देताना त्यावर प्लॅस्टिकचे पारदर्शक कव्हर जाणीवपूर्वक टाळण्यात आले होेते. निसर्गाची अवकृपा राज्यातील शेतकरी ज्या कारणांनी आत्महत्या करतो त्यातील एक कारण म्हणजे निसर्गाची अवकृपा हेही लक्षात घेतले पाहिजे, असे कदम म्हणाले. आपण निसर्गाचा समतोल राखत नसल्याने निसर्गसाखळी बदलली आणि त्याचा परिणाम शेती आणि शेतकºयांवर झाला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण संवर्धन झाले पाहिजे, असेही कदम म्हणाले. एक दिवस पर्यावरणासाठी प्लॅस्टिकबंदी तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाºया विविध उपाययोजना आणि घेण्यात आलेले निर्णय यांची अंमलबजावणी होते की नाही याचा आढावा घेण्यासाठी अधिकाºयांनी आठवड्यातील एक दिवस केवळ पर्यावरणासाठी राखून ठेवला पाहिजे, अशी सूचना रामदास कदम यांनी केली. यादिवशी केवळ पर्यावरणीय कामाचा आढावा घेतला पाहिजे, असेही सुचविले. तसेच प्लॅस्टिकमुक्त शाळांचा गौरव करण्याचीही सूचना त्यांनी मांडली.
प्लॅस्टिकबंदीबाबत अधिकाºयांनी व्यापक जनजागृती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:53 AM