शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी व शिक्षण विभागातील विविध पदांवरील अधिकारी यांच्या भेटीचे योग विविध कारणांनी येतच असतात. परंतु, शिक्षक संघटनांचे काही निवडक पदाधिकारी त्यांचे कार्यस्थळ सोडून नियमित शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक कार्यालयांमध्ये ठाण मांडून बसत असल्याने ते इतरांच्याही नजरेतून सुटू शकलेले नाहीत. त्यातच जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या लाच प्रकरणातही पंकज दशपुतेसारख्या शिक्षकाचे नाव आल्याने अशा शासकीय कार्यालयाच्या बिनकामी खेटा घालणाऱ्या शिक्षक पुढाऱ्यांविषयी साशंकतेला आणखीनच बळ मिळाले आहे. यात मुख्याध्यापक संघाचेही पदाधिकारी काही आहेतच, ही मंडळी शिक्षकांच्या निवडक वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांसाठी नियमित शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये निवेदने देताना दिसून येते. शिक्षण विभागाची शिक्षणाधिकारी, उपसंचालक, वेतनपथक, अशी वेगवेगळी कार्यलये पूर्ण होतही नाहीत, तोच कोणी शिक्षक आमदार, विधान परिषद आमदार अथवा मंत्री महोदय जिल्ह्यात येताच ही मंडळी हार, पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या मागे जातात. यात खरोखरच समस्याग्रस्त शिक्षकांचे चांगभलं करण्याचा उद्देश असतो की, केवळ प्रसिद्धीमाध्यमातून देशभर मुखदर्शन घडविण्याचा, हा कायम संशोधनाचा विषय राहिला आहे. परंतु, अशा देशभर मुखदर्शन करीत फिरणाऱ्या गटाकडून या प्रसिद्धी मोहिमेतून जेव्हा अन्य पदाधिकाऱ्यांना, प्रतिनिधींना डावलण्यात येते, अशा वेळी लाचखोर अधिकाऱ्यांसमोरच डावलले जाणारे शिक्षण प्रतिनिधीही प्रसिद्धीलोलूप पुढाऱ्यांविरोधात रोष व्यक्त करण्याच्या स्पर्धेत शिरकावाची साठमारी केल्याशिवाय राहत नाहीत, याचा प्रत्यय मागील काही दिवसांतील शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडींच्या माध्यमातून निश्चितच दिसून येत आहे.
लाच घेणारे अधिकारी, मग शिक्षक पुढाऱ्यांवर रोष का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:17 AM