विमानसेवेचे वेळापत्रक घोषित ; मुंबईला सकाळी, पुण्याला रात्रीची सेवासकाळी ६.३० वाजता मुंबईकडे टेकआॅफ
नाशिक : मुंबईतील विमानतळावर टाइम स्लॉट नसल्याने रखडलेली विमानसेवा अखेरीस मार्गी लागली असून, येत्या २३ डिसेंबरपासून ‘उडान’ अंमलात येणार आहे. सकाळी मुंबई आणि सायंकाळनंतर पुण्यासाठी ही सेवा उपलब्ध असणार आहे.एअर डेक्कन या विमान कंपनीने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून, गुरुवारपासून बुकिंग सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सेवेचा मुहूर्त टळण्याची शक्यता नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.ओझर येथे विमानतळ सज्ज असतानाही विमानसेवा सुरू नसल्याने उद्योग वर्तुळात नाराजीचे वातावरण होते. मध्यंतरी काही कंपन्यांनी सेवा सुरू केल्या आणि त्या बंदही पडल्या. त्यानंतर अनेक सर्व्हे झाले परंतु कंपन्या धाडस करीत नव्हत्या. दरम्यान, केंद्र सरकारने प्रादेशिक हवाई जोडणीसाठी उडान ही योजना आखल्यानंतर एअर डेक्कनने नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे अशी सेवा सुरू करण्याचे घोषित केले. परंतु मुंबई विमानतळ जीव्हीके कंपनीच्या ताब्यात असल्याने त्यांच्याकडून टाइम स्लॉट मिळत नव्हता. अखेरीस कंपनीला टाइम स्लॉट अलॉट झाला असून, त्यामुळे विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.नाशिकहून मुंबईसाठी भल्या सकाळी ही सेवा असेल, तर तेथून सायंकाळी परत येता येईल आणि त्याचबरोबर रात्री पुण्यासाठी जाण्याची सोय असून, तेथून परतण्यासाठी रात्रीच सेवा उपलब्ध आहे. विमान कंपनीने सकाळी ६.२० वाजता नाशिकहून मुंबईला उड्डाणाची वेळ निश्चित केल्याने त्यासंदर्भात ही काहीशी गैरसोयीची वेळ प्रारंभिक प्रवासाचे भाडे १ हजार ४२० रुपये असून, वेळेनुसार तिकिटाचे दर बदलते राहतील, असे सांगण्यात आले. उद्यापासूनच नोंदणी सुरू होणार आहे.नाशिकहून मुंबईसाठी सकाळी ही सेवा असेल, तर तेथून सायंकाळी परत येता येईल. त्याचबरोबर रात्री पुण्यासाठी जाण्याची सोय असून, तेथून परतण्यासाठी रात्रीच सेवा उपलब्ध आहे.विमानसेवेला अखेरीस मुहूर्त लागत आहे, हे महत्त्वाचे आहे.
त्यानिमित्ताने विमानतळही सुरू होईल. मुंबई सेवेची वेळ सकाळी जरा जास्त लवकर वाटत असली तरी तीच सोयीची आहे. पुण्याला रात्रीची सेवा दिल्याने तेथून चेन्नई किंवा अन्य भागात जाण्यासाठी अन्य स्वस्त दरातील विमानसेवा उपलब्ध होतील.- दत्ता भालेराव, अध्यक्ष, तान
अशा आहेत विमानाच्या वेळा
ओझरहून मुंबईसाठी निघण्याची वेळ- सकाळी ६.२० वाजता, मुंबईस पोहोचण्याची वेळ- सकाळी ७ वाजता.मुंबईहून ओझरसाठी निघण्याची वेळ- सायंकाळी ५.१० वाजता, नाशिकला पोहोचण्याची वेळ- सायंकाळी ६ वाजता.ओझरहून पुणेसाठी निघण्याची वेळ- सायंकाळी ६.२० वाजता, पुण्याला पोहचण्याची वेळ- सायंकाळी ७ वाजता.पुण्याहून निघण्याची वेळ- सायंकाळी ७.२० वाजता, नाशिक येथे पाहोचण्याची वेळ- रात्री ८ वाजता.