सूर्यवंशी यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यासाठी भिलकोट परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगेश हे गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुणे येथील सैन्य दलाच्या रूग्णालयात उपचार सुरू होते. आॅगस्ट २००२ मध्ये ते भारतीय सैन्य दलात सेवेत दाखल झाले होते. सध्या त्यांची नियुक्ती राजस्थान येथील बाडमेर येथे होती. सैन्य दलात कार्यरत असताना त्यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. मंगेश यांच्या निधनाचे वृत्त माळमाथा परिसरात पसरल्याने सर्वत्र शोककळा पसरली. मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव भिलकोट येथे आणण्यात आले. सजविलेल्या रथावरुन त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. वीर जवान तुझे सलाम अशा घोषणा देत व पुष्पचक्रअर्पण करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगेश यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
भिलकोटच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 4:42 PM