सातपूर : येथील प्रभाग क्रमांक ११ मधील स्वारबाबानगरातील घरांमध्ये गेल्या महिनाभरापासून गटारीचे दुर्गंधीयुक्त घाणपाणी शिरत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच नगरसेवकासह मनपाच्या अधिकाºयांनी धाव घेतली. येत्या तीन दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी यावेळी नागरिकांना दिले आहे. प्रभाग क्रमांक ११ मधील स्वारबाबानगरातील स्मशानभूमी-समोरील जवळपास १५ ते २० घरांमध्ये गेल्या महिनाभरापासून गटारीचे दुर्गंधीयुक्त घाणपाणी शिरत असल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. याबाबत येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक, महानगरपालिका विभागीय कार्यालय, राजीव गांधी भवन आणि आॅनलाइन तक्रारी केल्या होत्या, तरीही कोणीही लक्ष देण्यास तयार होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले होते. काही त्रस्त नागरिकांनी तर स्वत:चे घर सोडून अन्यत्र भाड्याचे घर घेऊन राहणे पसंत केले. त्रास अधिक होऊ लागल्याने येथील नागरिकांनी ‘लोकमत’कडे धाव घेतली. याबाबत लोकमतने सोमवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मनपाचे अधिकारी खडबडून जागे झाले.सोमवारी सकाळी नगरसेवक दीक्षा लोंढे, महानगरपालिकेचे ड्रेनेज विभागाचे उपअभियंता नितीन राजपूत, कनिष्ठ अभियंता व्ही. एन. धिवरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय पाटील, शाखा अभियंता एच. डब्ल्यू. मोमीन, आर. एल. कदम यांनी धाव घेऊन राहिवाश्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतली. येत्या तीन दिवसांत ही समस्या कायमस्वरुपी सोडविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, आमच्या समस्येला लोकमतने वाचा फोडली म्हणूनच नगरसेवक आणि अधिकारी धावून आले आहेत. म्हणून येथील रहिवाश्यांनी लोकमतचे आभार मानले आहेत.
प्रभाग ११ मधील स्वारबाबानगरात अधिकाऱ्यांची धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:28 AM