धनंजय वाखारे नाशिक : आरक्षणाच्या लढाईमुळे सध्या मनोज जरांगे-पाटील हे मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.. अशातच आंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील युवा शेतकरी संतोष मेढे हेही ‘सेम टू सेम’ जरांगे-पाटील म्हणून चर्चेत आले आहेत. जरांगे-पाटील काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वरला येथे येऊन गेले. येथील सभेतच संतोष मेढे या तरुणाने लक्ष वेधले. जरांगे-पाटील यांच्यासारखी शरीरयष्टी, केस रचना, अर्धवट पांढरी दाढी, बोलण्याची लकब यामुळे संतोषने लक्ष वेधून घेतले.
संतोष मेढे कोण?दहावी शिकलेल्या संतोष यांची आंबोलीत दीड एकर शेती आहे. ग्रामस्थांनी ते जरांगे-पाटील यांच्यासारखे दिसत असल्याचे हेरले आणि त्यांना त्र्यंबकेश्वरला जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी घेऊन गेले, पण गर्दीमुळे संतोष मेढे यांची जरांगे-पाटील यांच्याशी भेट होऊ शकली नाही, पण कार्यकर्त्यांनी त्यांना आंतरवाली सराटीला येण्याचे निमंत्रण दिले आहे. संतोष अश्वप्रेमी आहेत. दरवर्षी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखीबरोबर त्यांचा अश्व सहभागी असतो.
मी हुबेहूब जरांगे दादांसारखा दिसतो, हे समजल्यावर मलाही खूप आनंद झाला. जरांगे दादा यांनी सुरू केलेल्या आरक्षणाच्या लढाईत मीही माझा खारीचा वाटा उचलणार आहे. - संतोष मेढे, आंबोली.