ओझर टाऊनशिप : दिल्ली येथे खून, दरोडे, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या फरिदाबाद येथील दोन अट्टल गुन्हेगारांना दिल्ली स्पेशल क्राईम ब्रँच व ओझर पोलीस ठाणे, गुन्हे शोध पथक यांनी संयुक्त कारवाई करत ओझर येथे ताब्यात घेतले.याबाबत ओझर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ओझर येथील मुंबई आग्रा महामार्गावरील पंचवड गणपती मंदिराच्या मागे उषा हॉस्पिटललगतच्या हेवन हाईट्स नावाच्या इमारतीत प्रकाश विजय मोरे यांच्या मालकीचा फ्लॅट (क्रमांक १०) असून, तो फ्लॅट ओझरच्या वायू सेनेत कार्यरत मनोरंजन साहू (रा. एअरफोर्स कॉलनी, ओझर) यांनी गेल्या महिन्यात भाड्याने घेतला होता.
याच फ्लॅटमध्ये दिल्लीतील दोन अट्टल गुन्हेगार अनुक्रमे टेकचंद खेडी श्रीडालचंद (३०) व दयाचंद एलियाज डिलर (३०) हे भाडेकरू म्हणून राहत होते. या गुन्हेगारावर दिल्ली व परिसरातील पोलीस ठाण्यात खून, दरोडे, विदेशी शस्त्राचा वापर करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.हे सराईत गुन्हेगार दिल्लीसह परिसरात गुन्हे करून फरार झाले होते.
दिल्ली पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या गुन्हेगारांच्या ठावठिकाणाची माहिती मिळाली तेव्हा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी ओझर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला, त्यानंतर दिल्ली पोलिसांची स्पेशल क्राईम ब्रँच आणि ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, ओझर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे अनुपम जाधव, किशोर अहिरराव, जितेंद्र बागुल, दीपक गुंजाळ यांच्या पथकाने हे अट्टल गुन्हेगार राहत असलेल्या हेवन हाईट्स या इमारतीतील फ्लॅट क्रमांक १० येथे छापा टाकून आरोपी टेकचंद खेडी श्रीडालचंद आणि दयानंद एलियाज डिलर यांना ताब्यात घेतले.