येथील ग्रामपंचायत निवडणूक यंदा चांगलीच चर्चेत राहिली. कारण पारंपरिक प्रतिस्पर्धी सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांच्या नेतृत्वाखालील नागरिक आघाडी पॅनलने सातपैकी सहा जागा जिंकून एकतर्फी विजय निश्चित केला होता .माघारीच्या दिवशीच नागरिक आघाडी पॅनेलचे १० सदस्य बिनविरोध निवडून आले. उर्वरित सात जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होऊन ६ जागा जिंकून कदम गटाने ओझर ग्रामपंचायतीमध्ये आपली सत्ता कायम राखली. ओझर विकास पॅनलच्या जयश्री धर्मेंद्र या एकमेव उमेदवार निवडून आल्या आहेत. राज्यातील इतर उमेदवारांप्रमाणे ओझरच्या सरपंचपदाची सोडत कधी जाहीर होणार याची नागरिकांना उत्सुकता लागून होती. गुरुवार (दि.२८) रोजी आरक्षण जाहीर झाले असून अनु. जाती प्रवर्गातील स्त्री की पुरुष सरपंच होणार हे ३ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.ओझर ग्रामपंचायतीमध्ये सध्या दोन उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. प्रभाग क्र .१ मधील स्त्री उमेदवार चंदा गवळी आणि प्रभाग क्र .३ मधील नरेंद्र गायकवाड . ३ फेब्रुवारी होणाऱ्या सरपंच पद हे स्त्री राखीव असेल का पुरुष हे स्पष्ट होणार असल्याने सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याविषयी उत्सुकता वाढली आहे.ओझरला नगरपरिषदेची टांगती तलवार कायम असल्याने ओझरचे सरपंचपद किती काळ टिकेल हे लवकरच स्पष्ट होणार आहे. .
ओझरला अनुसूचित जातीच्या उमेदवाराला मिळणार सरपंचपदाचा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 2:51 PM