नाशिक : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत असतो परंतु या वेळी तालुक्यात उशिराने पावसाला सुरुवात केली असली तरी गेल्या दोन दिवसांपासून सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी येथे रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या रिक्षावर वृक्ष पडल्याने रिक्षाची मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि जोरदार सोसाट्याच्या वा-यासह पावसाला सुरुवात झाल्याने आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास जुन्या आग्रारोडवरील राम मंदिराच्या पुढे सुमारे २० वर्षांपूर्वीचे भेंडीचे झाड रिक्षावर कोसळले सुदैवाने रिक्षात प्रवासी वा चालक नव्हते नाहीतर मोठी हानी झाली असती परंतु रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान अगोदरच कोरोना-१९ या जीवघेण्या आजाराने नागरिक त्रस्त झाले त्यात लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. कुठेतरी शिथिलता मिळाल्याने रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र या रिक्षावरच भलेमोठे भेंडीचे झाड पडल्याने या रिक्षा चालकासमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यानच्या काळात सकाळी मुख्य बाजारपेठेतील रस्ता असल्याने काही प्रमाणात वाहतूकीवर परिणाम झाला होता. परंतु नगर परिषदेच्या अग्नीशामक गाडीचे चालक व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरीत येऊन हे मुख्य रस्त्यावर पडलेले भेंडीचे झाड बाजूला सारून रस्ता मोकळा करून दिला परंतु या कर्मचाऱ्यांना नगर परिषदेने झाड तोडण्यासाठी कुठल्याही प्रकारचे साहित्य दिले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
इगतपुरी : २० वर्षांपूर्वीचे भेंडीचे झाड रिक्षावर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 5:13 PM