नाशिक : जमिनीच्या वादाच्या फौजदारी दाव्यासाठी अॅड. रमेशचंद्र धुळचंद बाफणा (वय ७५) यांनी चौधरी नामक तोतया वकिलाकडे वकिलपत्र दिले होते. २००९ सालापासून २०१४पर्यंत चौधरीने त्यांच्याकडून न्यायालयीन कामकाजासाठी वेळोवेळी रोख व धनादेशांच्या स्वरूपात सुमारे २२ लाख ५० हजार रुपये घेतले. दाव्याची कोणतीही प्रगती होत नाही व सदर वकिलाकडून अधिक रकमेची पुन्हा मागणी केली जात असल्याने बाफणा यांना संशय आला व त्यांनी त्याबाबत चौकशी करून दिल्लीच्या बार कौन्सिल येथून माहिती मागविल्यानंतर त्यांचा संशय खरा ठरला. बाफणा यांनी चौधरी नामक सर्वोच्च न्यायालयाचा वापर करणाऱ्या तोतया वकिलाविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. बाफणा यांनी माहितीच्या अधिकारामध्ये दिल्लीच्या बार कौन्सिलकडून चौधरी नामक वकिलाची माहिती मागितली. कौन्सिलने त्यांना अशी कोणतीही व्यक्तीची नोंद नसल्याची माहिती दिली. वेळोवेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बाफणा यांनी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याकडे निवेदन दिले. बाफणा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चौधरीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
वृद्ध वकिलास २२ लाखांना फसविले
By admin | Published: January 17, 2016 12:37 AM