नाशिक : शहरात पावसाचा जोर वाढत असून, अनेक भागांत खड्ड्यांचे साम्राज्य बघायला मिळत आहे. तसेच शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकातही मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले असून, त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच स्थानकाच्या आवारात पावसाचे पाण्याचे तळे साचत असून, प्रवाशांना बसमध्ये चढ-उतर करताना या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.पावसामुळे चार महिने शहरातील नागरिकांना तसेच वाहनधारकांना या खड्ड्यांचा सामना करावा लागतो. सध्या शहरातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. विशेषत: गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक अपघात घडतात. तसेच वाहनधारकांना पाठीच्या आणि मणक्याचे आजार बळावले आहेत. त्याचबरोबर दुचाकी आणि चारचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पावसाळा संपत आल्याने आता महापालिकेने या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे. मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यात शहरातील जवळपास सर्वच भागांत पाण्याचे डबके साचले होते. तसेच यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे झालेले बघायला मिळत होते. त्यात पुन्हा पावसाच्या आगमनामुळे शहरातील प्रमुख असलेल्या सीबीएस बसस्थानकाची मोठी दुरवस्था झालेली बघावयास मिळत आहे. याठिकाणी शहरासह पूर्ण जिल्ह्याचे प्रवासी याठिकाणाहून प्रवास करत असतात. त्यामुळे दररोजच याठिकाणी मोठी गर्दी असते. त्यात याठिकाणी पूर्ण स्थानकाच्या आवारात खड्डे झाले असून, प्रवाशांसह बसेसलाही अडचण निर्माण होत आहे. तसेच प्रवासी ज्या ठिकाणी बसची वाट बघत असतात त्याठिकाणीच पाण्याचे डबके साचत आहे. त्यामुळे प्रवाशांना या पाण्याच्या डबक्यांमधूनच बसमध्ये चढ-उतर करावा लागत आहे. याठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागांतील प्रवासी ये-जा करत असतात यामध्ये वयोवृद्ध प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.प्रवाशांना थांबावे लागते बाहेरचसीबीएस बसस्थानक शहराचे मध्यवर्ती बसस्थानक असून, याच ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होत आहे. याठिकाणी प्रवाशांची प्रचंड गर्दी असते त्यामुळे काही प्रवाशांना बसची वाट बघण्यासाठी बाहेर उभे राहावे लागत असते.पावसामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे तयार झाले असून, बसला सुद्धा यामुळे अडथळे निर्माण होत आहे. तसेच याठिकाणी पाण्याचे मोठ डबके साचले असल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठी सुद्धा जागा नसते.बसस्थानकातील मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे सर्वांत जास्त त्रास हा या प्रवाशांना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून महामंडळाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.गेल्या दहा वर्षांपासून सीबीएस बस स्थानकावरून सिन्नर-नाशिक प्रवास करत आहे. मात्र कित्येक वर्षांपासून याठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुधारणा झालेल्या दिसून येत नाही. उलट आहे त्याची दुरवस्था होताना दिसून येत आहे. त्यात पावसामुळे स्थानकाची अवस्था बिकट झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे झाले असून, स्थानकात डबके साचले आहे.महेश बेणके, प्रवासी
जुने सीबीएस बनले खड्ड्यांचे आगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 1:13 AM