देवळाली कॅम्प : येथील गवळीवाडा भागात ब्रिटिशकाळापासून असलेले एक घर सोमवारी अचानक कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ढिगाºयाखाली अडकलेल्या दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली. देवळाली कॅम्प गवळीवाडा येथील ख्राइस्ट चर्चच्या समोर गायकवाड व पगारे कुटुंबीय एका जुन्या पद्धतीच्या चाळीच्या घरात राहतात. गायकवाड कुटुंबीय झोपलेले असताना अचानक त्यांच्या अंगावर छताचा काही भाग कोसळला. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्याने एकच धावपळ उडाली. खालच्या मजल्यात राहणारी वृद्धा आशाबाई गायकवाड व त्यांचा मुलगा कैलास गायकवाड ढिगाºयाखाली दाबले गेले होते. येथील कार्यकर्ते सुरेश कदम, रवींद्र पगारे, रमेश शिरसाठ, रवि झनकर यांच्यासह छावणी परिषदेचे अधीक्षक सतीश भातखळे, युवराज मगर, राजू ठाकूर आदींनी छावणी परिषदेच्या कर्मचाºयांच्या साह्याने ढिगाºयाखाली दबलेल्या दोघांना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेमुळे कॅम्पमधील जुन्या घरांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कॅम्प परिसरात अनेक लहान-मोठी पुरातन घरे आहेत. काहींचा वापर होत असला तरी घरांची अवस्था बिकट आहे. काही घरे वापराविना पडून आहेत. पावसाळ्यात ही घरे धोक्याची ठरतात. त्यामुळे या घरांना पावसाळ्यापूर्वीच धोकादायक म्हणून नोटीस देणे अपेक्षित आहे. तसेच पावसाळ्यात अशा जीर्ण वाड्यातील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्याची व्यवस्थाही अपेक्षित असल्याने कॅन्टोन्मेंटकडून फारशी काळजी घेतली नसल्याची चर्चा आहे. काही भागांत अत्यंत दाट लोकवस्तीच्या ठिकाणी अशी घरे आहेत. या धोकादायक घरांमुळे आजूबाजूच्या घरांनाही धोका निर्माण झालेला आहे, याचा विचार करून कारवाई करावी आणि जुनी धोकादायक घरे जाहीर करावीत, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
पुरातन घर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 11:57 PM