नाशिक : वयाची सत्तरी ओलांडलेल्या आजीबाईंचे पर्यावरण प्रेम वाखाण्याजोगे आहे. स्व खर्चाने कापडी पिशव्या घरी तयार करतात आणि शहरात सार्वजनिक ठिकाणी फिरून नागरिकांना त्यांचे मोफत वाटप करत विमल स्वामी-वसमतकर या आजी पर्यावरण जपण्याचे आर्जव करताना दिसतात. मागील पाच वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम स्वयंस्फूर्तीने उच्चशिक्षित सूनबाईच्या साथीने सुरू आहे.
पर्यावरण तुमच्या दारी, कापडी पिशवी तुमच्या घरी... असे सांगत ‘प्लॅस्टिक पिशवी विसरा, कापडी पिशवी वापरण्याची लाज बाळगू नका..’ असे आवाहन त्या आपल्या कडक आवाजात तरुणाईला सांगतात. समाजात पर्यावरणाविषयीच जनजागृती वाढीस लागावी, प्लॅस्टिक पिशव्यांची नागरिकांना झालेली सवय मोडावी अन् पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिक हद्दपार व्हावा, असे विमल आजींना वाटते. यामुळेच घरी लग्न कार्यात नातेवाईकांनी आहेर म्हणून दिलेल्या नव्या कोऱ्या साड्या असो किंवा शर्टपीस, पॅन्टपीस असो त्यापासून आकर्षक पद्धतीने कापडी पिशव्या तयार करत पिशवीला चांगल्या दर्जाची चेन लावून त्याचे वाटप करतात. कुठेही सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये परिसरातील भाजी बाजारात, मंदिरांमध्ये शाळांमध्ये जात आजीबाई कापडी पिशव्या लोकांच्या हाती देत पर्यावरण जपा असे आवाहन करतात.सिडको परिसरातील खुटवडनगर भागात राहणाऱ्या या आजीबाईंचा उतारवायातसुद्धा उत्साह तरूणाईला लाजवेल असाच आहे. त्या कोणाकडूनही कापड, साडया घेत नाहीत, तर त्यांच्याकडे असलेल्या साड्या व कापडाच्या माध्यमातूनच पिशव्या शिवून वाटतात. त्यांच्या या पर्यावरणपुरक जनप्रबोधनपर कृतीशील कार्याला सूनबाई शर्मिला वसतमतकर यांचीही मोलाची साथ लाभत आहे.
७,५०० कापडी पिशव्यांचे वाटप
पाच वर्षांमध्ये आजीबाईंनी तब्बल ७,५०० कापडी पिशव्या, ५ हजार कापडी पाकिटे तयार करून वाटली आहेत. तसेच ७० प्रकारच्या बी-बीयांपासून तयार केलेल्या राख्यांचेही वाटप त्यांनी केले आहेत. केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या आजीबाईं उतवारवयातसुद्धा पर्यावरणाविषयीची सजगता दाखवून जनजागृतीसाठी प्रयत्नशील आहेत.