नाशिक : स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवंगत माजी सैनिकाच्या ८२ वर्षीय निराधार पत्नीने नाशिक महापालिकेत शासनाच्या निराधार घरकुल योजनेसाठी दिलेले कागदपत्रे बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेने गहाळ केले आहेत़ चालता येत नसतानाही ही वृद्ध महिला घरकुलासाठी महापालिकेच्या वरीष्ठ अधिका-यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवते आहे़ विशेष म्हणजे महापालिकेचे अधिकारी तिची खिल्ली उडवित तुला कशाला हवे घर, भीक मागून खा असा सल्ला देत असल्याचे निवेदन शहीदपत्नी कमल दगडू गुरव (रा़ आंबेडकर मार्केट, सातपूर कॉलनी) यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांना दिले आहे़
मूळच्या साता-याच्या मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात सैनिक असलेले दगडू पिलू गुरव यांच्याशी कमल गुरव यांचा विवाह झाला़ आर्टिलरी सेंटरकडून पती सैन्यात असल्याची कागदपत्रेही गुरव यांच्याकडे होती़ अपत्य नसलेल्या तसेच निराधार कमल गुरव यांनी झुणका भाकर केंद्र तसेच छोटी - मोठी कामे करून आतापर्यंत कसाबसा आपला उदरनिर्वाह केला़ जिल्हाधिकारी महेश झगडे यांच्या कार्यकाळात लोकशाही दिनामध्ये माजी सैनिक पत्नी कमल गुरव यांना घरकुल मंजूर केल्याचे त्या सांगतात़ त्यासाठी सर्व कागदपत्रेही त्यांनी महापालिकेला दिली, त्यांना चुंचाळे, हिरावाडी येथे घरकुल देतो असे सांगण्यात आले़ मात्र कागदपत्रेच गहाळ झाली की केली? त्यांना अखेरपर्यंत घरकुल मिळालेच नाही़ कागदपत्रे गहाळ झाली असे सांगितले जाते, त्यांच्या पतीचे सर्व्हिस बुकही हिसकावून घेतल्याचे त्या सांगतात़
अनेक वर्षांपासून त्या घरकुलासाठी महापालिकेचे सातपूर विभागीय कार्यालय तसेच राजीव गांधी भवन या ठिकाणी खेटा मारताहेत़ विशेष म्हणजे काही रिक्षाचालक गुरव यांच्या वृद्धत्वाकडे पाहून रिक्षाचे भाडेही घेत नाहीत़ सातपूर कॉलनीत चाळीस वर्षांपासून राहत असलेल्या गुरव सध्या सातपूर कॉलनीतील भाजी मंडईत उघड्यावर राहत आहेत़ घरकुलासाठी दिलेले व गहाळ केलेले कागदपत्रे शोधून घरकुल मिळावे असे निवेदन आयुक्तांना दिले आहे़घर विकून खाऊ