लासलगाव : निफाड तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचे खते उपलब्ध करून द्यावे तसेच एमआरपीपेक्षा जास्त दराने खतांची विक्री करू नये,चढ्या दराने विक्री केल्यास विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा निफाड तालुका कृषी अधिकारी बी. जी. पाटील यांनी दिला आहे.
या खरीप हंगामात खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या किमती वाढविलेल्या आहेत; परंतु निफाड तालुक्यातील सर्व खत विक्रेत्यांनी त्यांच्या विक्री केंद्रावर आधीच शिल्लक असलेला खतसाठा जुन्या किमतीनुसार विक्री करणे बंधनकारक असल्याचे पाटील यांनी सांगितले.
खत विक्रेत्यांनी त्यांच्याकडे असलेला जुना खतसाठा नवीन किमतीनुसार विकण्याचा प्रयत्न केल्यास खत नियंत्रण कायदांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच तालुक्यातील शेतकरी बांधवांनीदेखील खत खरेदी करताना मूळ बिल घेणे आवश्यक आहे, खताच्या पिशवीवर नमूद एमआरपी शेतकऱ्यांनी पडताळून पाहावी. त्या किमतीपेक्षा जास्त दर खत विक्रेते मागत असेल तर तत्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.