नाशिक : जुने नाशिकमधून आलेल्या ५० ते ६० जणांच्या टोळक्याने गुरुवारी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावावर जाऊन अक्षरश: धुडगुस घालत तरणतलावाच्या मालमत्तेची तोडफोड केली. या प्रकाराबाबत सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. घडलेल्या घटनेप्रसंगी या विक्षिप्त युवकांनी महिलांसमोर अंगविक्षेप केल्यानंतरही त्याबाबत कोणताच गुन्हा दाखल झाला नसल्याबाबत जलतरणप्रेमींकडून सखेद संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
गुरुवारी सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या सुमारास जुने नाशिकमधून आलेल्या या टोळक्याने तिकीट काऊंटरच्या ठिकाणीच आरडाओरड करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर बहुतांश जण तिकीट न काढताच कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत आतमध्ये घुसले. तिथे त्यांनी अचकट विचकट आवाज काढत आणि तरणतलावात पोहणाऱ्या अन्य व्यक्तींची काळजी न करता उलट-सुलट उड्या मारणे, किंचाळणे सुरूच ठेवले. तरणतलावावर काही महिला त्यांच्या बालकांना घेऊन आल्या असतानाही या युवकांनी त्यांच्यासमोरही अर्धचड्डीत अंगविक्षेप करण्याचे प्रकार करीत पूर्ण वेळ तिथे उपस्थित जलतरणप्रेमींना जेरीस आणले. सायंकाळी ७ वाजता बॅचची वेळ संपल्यानंतर सामान्य जलतरणप्रेमी तलावाबाहेर पडून रवाना झाले. त्यानंतरही बराच काळ या युवकांनी तरणतलावाबाहेर पडण्यास नकार देत तिथेच ठाण मांडले. अखेरीस तरणतलावातील कर्मचाऱ्यांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे विनवणी करून कसेबसे बाहेर काढले. त्यानंतर या युवकांनी बाथरूममध्ये जाऊन तेथील शॉवर तसेच पाईप्सची तोडफोड करीत तरणतलावातून पळ काढला. त्यानंतर या युवकांनी तोडफोड केल्याची घटना लक्षात येताच तलावावरील व्यवस्थापक रूपचंद काथे यांनी सरकारवाडा पोलीस स्टेशनला धाव घेतली. तिथे पोलिसांकडे त्यांनी संरक्षणाचीदेखील मागणी केली. मात्र, पोलीस संरक्षण सशुल्क घ्यावे लागेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच पोलिसांकडून तक्रारीची दखलदेखील घेण्यात आलेली नाही. या घटनेमुळे तसेच देखभाल दुरुस्तीसाठी शुक्रवारचा पूर्ण दिवस तरणतलाव बंद ठेवावा लागल्याने जलतरणप्रेमींनी संतप्त स्वरात भावना व्यक्त केल्या आहेत.
इन्फो
५ वर्षांपूर्वीदेखील युवकांकडून तोडफोड
सावरकर तरणतलावावर पाच वर्षांपूर्वीदेखील जुने नाशिकच्याच २५ ते ३० युवकांनी येऊन अशाचप्रकारे तरणतलावाचे नुकसान केले होते. मात्र, त्यावेळी या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत रात्रीतून प्लंबर बोलावून दुरुस्ती करून घेण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा तशाच प्रकारे धुडगूस घालण्यात आल्याने बहुदा हे तेच युवक असण्याचा संशय जलतरणप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे.