पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे रविवार (दि. २०) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार येथून रिक्षात बसून अंबडकडे चालले होते. रिक्षाचालकाने जाधव यांना पाठीमागे अगोदरच बसलेल्या दोन प्रवाशांच्या मध्यभागी बसवले. यावेळी बाजूला बसलेल्या दोन्ही प्रवाशांनी जाधव यांच्यासोबत हुज्जत घातली. उंटवाडी येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी रिक्षाचालकाने त्याची रिक्षा उभी केली. यावेळी हुज्जत घालत असल्याचे कारण देत भाडे न घेता रिक्षाचालकाने जाधव यांना खाली उतरवून दिले. खाली उतरल्यानंतर जाधव यांनी त्यांचे खिसे तपासले असता त्यांच्या पँटच्या खिशातील २० हजार तर शर्टच्या खिशातील २०० रुपये रिक्षातील त्या दोन्ही प्रवाशांनी काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत तत्काळ सरकारवाडा पोलिसांकडे धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून रिक्षाचे वर्णन पोलिसांनी लिहून घेत अज्ञात संशयित रिक्षाचालक व प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रिक्षा प्रवासात वृद्धाची २० हजारांची रोकड लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 4:14 AM