लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपखाली सापडून मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. सदर दुर्घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सटाणा- मालेगाव रस्त्यावरील जुनी शेमळीनजीक घडली. दरम्यान, दुर्घटनेत ठार झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांच्या आर्थिक मदतीसाठी जुनी शेमळी येथील संतप्त नागरिकांनी सटाणा-मालेगाव रस्त्यावर ठिय्या देऊन अडीच तास वाहतूक रोखून धरली. जुनी शेमळी येथील शेतमजूर योगेश बारकू निकम (३१) हा शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मोटारसायकलने गावाजवळच असलेल्या शेतात जात असताना हॉटेल गौरंगसमोर मालेगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत योगेश जागीच ठार झाला. अपघाताचे वृत्त पसरताच संतप्त झालेल्या जुनी शेमळी येथील तीनशेहून महिला व पुरुषांनी घटनास्थळी ठिय्या देऊन मालेगाव रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. योगेशच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच संबंधित चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाटील यांनी संतप्त झालेल्या नागरिकांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्याची विनंती केली. मात्र संतप्त नागरिक आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावेळी जुनी शेमळीचे सरपंच अमोल बच्छाव, भारत बच्छाव, साखरचंद पाटील आदींशी पोलीस निरीक्षक पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली.
जुनी शेमळीनजीक अपघात; युवक ठार
By admin | Published: July 09, 2017 11:14 PM