नाशिक : काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर ८ दिवस ७ तासांमध्ये पार करीत पहिल्या विश्वविक्रमाची नोंद केलेला युवा सायकलपटू ओम महाजन याने शुक्रवारी ‘लेह ते मनाली’ हे ४३३ किलोमीटर अंतर अवघ्या २७ तास ५५ मिनिटात पार करुन नवीन विश्वविक्रमाची नोंद केली. यापूर्वीचा या अंतराचा विश्वविक्रम सैन्यदलातील नाशिकचे अधिकारी भारत पन्नू यांच्या नावावर ३३ तासांचा होता.
अवघ्या १८ वर्षांच्या ओमने आधीच्या विक्रमापेक्षा तब्बल ५ तास ५ मिनिटे इतकी कमी वेळ देत हा अत्यंत खडतर मार्ग पूर्ण केला आहे. लेह ते मनाली या मार्गावर तब्बल ४ मोठे पर्वत असतानाही ते सायकलवर चढून उतरुन आणि रस्ता तसेच तेथील हवामानही बिकट असताना त्यावर मात करीत ही विक्रमी कामगिरी पूर्ण केली आहे. ओमने या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी दहा दिवसांपूर्वीच लेहला प्रयाण केले होते. त्यानंतर त्याने २२ जुलैला सकाळी ६ वाजता या थरारक प्रवासाची सुरुवात केली होती. हाडे गोठविणाऱ्या थंडीत टोकदार वळणांचे रस्ते आणि एकीकडे दरी असणाऱ्या रस्त्यांवरुन त्याने वाटचाल करण्यास प्रारंभ केला. प्रारंभीच्या काळात पायात क्रॅम्प येऊनदेखील ही शर्यत सोडून देण्याचा विचारदेखील त्याने केला नाही. सर्व प्रकारच्या प्रतिकुल परिस्थितीचा सामना करीत ओमने तब्बल ४३३ किलोमीटरचे अंतर शुक्रवारी (दि. २३) सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी पूर्ण केले. या संपूर्ण कालावधीत त्याने केवळ प्रत्येकी २० मिनिटांची पॉवर नॅप घेऊन अंतर पार केले. ओमच्या या प्रवासात त्याला डॉ. महेंद्र महाजन, मनोज महाले, बलभीम कांबळे आणि संदीप कुमार तसेच प्रशिक्षक मितेन ठक्कर यांचे सहाय्य लाभले.
इन्फो
हे ४ पर्वत ओलांडले
ओमने ४३३ किलोमीटरच्या अंतरात टांगलांग ला हा १७ हजार ५८२ फूट उंचीचा आणि लाचुंग ला हा १६ हजार ६१६ फूटांचा आणि नाकी ला हा १५ हजार ९१९ फूट उंचीचा तर बारलाचा ला हा १५ हजार ९१९ फूट उंचीचा पर्वत ओलांडला. तसेच या खडतर प्रवासात नुकताच १० हजार फूट उंचीवर झालेल्या अटल टनेल या बोगद्यालादेखील पार करत शर्यत पूर्ण केली.