न्यायडोंगरी : ह्यओम श्री शनेचराय नमः, शनी महाराज की जयह्णचा नारा देत भाविक भक्तांनी शनिवार (दि.३०) रोजी शनी अमावास्येनिमित्त नांदगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र नस्तनपूर येथील ऐतिहासिक पुरातन शनी महाराजांची यात्रा उत्सवात पार पडली.
हजारो भाविकांनी शनी देवाचे दर्शन घेतले. जिल्हाभरातील शनी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याने दिवसभरात हजारो भाविक भक्त शनी चरणी लीन झाले. गेल्या दोन वर्षे कोरोनामुळे दर्शनासाठी व यात्रेसाठी निर्बंध लावले असल्याने शनी महाराजांचे दर्शन घेता आले नव्हते. शनी मंदिरात पहाटेच्या वेळी ह्यशनीह्ण देवाला स्नान, पूजा, अभिषेक व त्यानंतर काकड आरती करण्यात आली.
दुपारी नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खाडे यांनी पत्नीसह पूजाविधी व आरती केली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नारायण अग्रवाल, जनरल सेक्रेटरी माजी आमदार अनिल आहेर, खासेराव सुर्वे, विजय चोपडा, डॉ. शरद आहेर आदी उपस्थित होते. सकाळपासूनच भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी मंदिर ट्रस्टने चोख व्यवस्था केली होती.
यामुळे भाविकांना दर्शन घेणे अत्यंत सोयीचे झाले होते. मंदिर परिसरात यावेळी विविध खेळण्यांची, पाळण्यांची, पेढ्यांची दुकाने, तसेच कडक ऊन असल्याने रसवंतीसह थंड पेयांची दुकानेही थाटली होती. रात्री उशिरापर्यंत हजारो भक्तांनी शनी महाराजांचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविकांनी शनी महाराजांना अभिषेकदेखील केला.
भर उन्हात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शनी महाराज ट्रस्टने केली होती.(३० न्यायडोंगरी)