नाशिक - अवतीभोवतीच्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच दाखल झालेला ओमायक्रॉन गुरुवारी (दि. ३०) नाशकातही दाखल झाला आहे. गंगापूर रोड परिसरातील एक दहा वर्षांचा मुलगा ओमायक्रॉनने बाधित आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र, या बालकात कोणतीही लक्षणे आढळून आली नसून, त्याची प्रकृती स्थिर आहे.
मुंबईसह पुणे, ठाणे, औरंगाबाद, नगर या नाशिकलगतच्या जिल्ह्यांमध्ये ओमायक्राॅनचे रुग्ण यापूर्वीच आढळले होते. मात्र, नाशिककर आतापर्यंत त्यापासून लांब होते. बुधवारी सायंकाळी संबंधित बालकाचा अहवाल ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळल्याने मनपा आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासकीय स्तरासह आरोग्य यंत्रणांकडूनही विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील काही संशयित रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील हा नमुना बाधित आढळून आला आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता हा विषाणू पसरू नये, यासाठी कोरोना नियमांचे पालन करण्याची गरज आहे. स्वतःचे लसीकरण करून घेणे हे यावरील सर्वाधिक महत्त्वाचे सुरक्षाकवच असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
आई-वडील बाधित मात्र प्रकृती स्थिर
१८ डिसेंबरला सर्वप्रथम या बालकाचे आई-वडील कोरोनाबाधित झाल्याचे आढळले. त्यानंतर १९ तारखेला या बालकाचीही चाचणी केल्यानंतर तो बाधित आढळून आला. दरम्यान, संबंधित खासगी लॅबने त्या बालकाचे नमुने रॅन्डम तपासणी म्हणून जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले. त्याचा अहवाल प्राप्त होण्यास १२ दिवसांचा कालावधी लागला असून, हा बालक ओमायक्रॉनग्रस्त असल्याचे त्या तपासणीत आढळले आहे. दरम्यान, आता या बालकाच्या माता-पित्याचे तसेच त्याच्याशी संबंधित रुग्णांचे नमुनेदेखील जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात येणार असल्याचे महापालिका वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.
यंत्रणा अलर्टवर
गेल्या दहा दिवसात हे तिन्ही रुग्ण घरीच विलगीकरणात राहून उपचार घेत होते. मात्र, बालकाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बालक हा असिम्प्टॅमॅटिक असून, प्रकृतीदेखील स्थिर असल्याचा आरोग्य विभागाला दिलासा आहे. मात्र, पहिलाच कोरोना रुग्ण आढळला असल्याने जिल्ह्यातील आणि मनपा क्षेत्रातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून, अधिकाधिक दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.