लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : श्वसनाशी निगडित विषाणू तसेच बुरशी नष्ट करण्यास नायट्रिक ऑक्साइड प्रभावी ठरते, हे आंतरराष्ट्रीय मानकांवर सिद्ध झाले असल्यानेच त्या वायूच्या स्प्रेला जगातील अनेक देशांमध्ये मान्यता मिळाली आहे. त्याचप्रमाणे प्राणायामातील भ्रामरी आणि ओमकाराने नाकात नायट्रिक ऑक्साइडची निर्मिती होते, हेदेखील सप्रमाण सिद्ध झाले आहे. त्यामुळेच कोरोनाकाळात भ्रामरी आणि ओमकार आदी प्राणायाम कोविडसारख्या श्वसनाशी आणि प्रतिकारशक्तीशी निगडित आजारांना आळा घालणे शक्य असल्याचे वैज्ञानिक संशोधनांचा निष्कर्ष असल्याचे योगगुरू गंधार मंडलिक यांनी सांगितले.
योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगाचार्य विश्वासराव मंडलिक यांचे सुपुत्र योगगुरू गंधार मंडलिक यांनी साधलेल्या मनमोकळ्या संवादात कोरोनाकाळात जगभरात योगाचा प्रसार अधिक वेगाने झाल्याचे सांगितले. योगशास्त्राच्या अभ्यासाने शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतात हे ऑस्ट्रेलियातील हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील विविध संशोधनांतून, अभ्यासांदरम्यान सिद्ध झाले आहे. कोरोना हा श्वसनाइतकाच प्रतिकारशक्तीशी निगडित असल्याचे दिसून येते. शारीरिक किंवा मानसिक ताणतणावांमुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी झाली असेल तर तो लवकर कोरोनाबाधित होतो, तर प्राणायाम आणि योगसाधनेने सर्व प्रकारचे ताणतणाव कमी होत असल्याचे सिद्ध झाले असल्याने कोरोनाकाळात योगसाधनेला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये योगाच्या ऑनलाइन वर्गांना हजारोंची उपस्थिती लाभल्याचेही मंडलिक यांनी नमूद केले.
इन्फो
तासाभराच्या योग अभ्यासाने स्ट्रेच मार्कर्स कमी
केवळ एक तासाच्या योग अभ्यासाने स्ट्रेसचे मार्कर्स मानले जाणारे कॉर्टीझॉल, आयएल -६, सीआरपी हे कमी होत असल्याचे वैद्यकीय अभ्यासातून सिद्ध झाले आहे. मनावरील तणाव निवळला की प्रतिकारशक्ती वाढते, हेदेखील सर्वज्ञात आहे. त्यामुळे योगाभ्यासाचा लाभ कोविडमध्ये निश्चितपणे होतो, हे जगालादेखील मान्य झाले आहे.
इन्फो
कोरोनाचे विषाणू नष्ट करण्याची क्षमता
नायट्रिक ऑक्साइडचा स्प्रे नाकात मारल्यानंतर हा वायू २४ तासांत कोरोनाचे विषाणू ९५ टक्के, तर ७२ तासांत ९९ टक्के मारतो. हे आंतराष्ट्रीय स्तरावर मान्य झाले असल्यानेच कॅनडा, इस्रायलसह अनेक देशांनी नायट्रिक ऑक्साइडच्या स्प्रेला त्यांच्या देशात मान्यता दिली आहे. तसेच
भ्रामरीत निघणारा भ्रमरासारखा ध्वनी, तसेच ओमकार ध्वनीने श्वसनमार्गात नायट्रिक ऑक्साइडची निर्मिती होत असल्याचेही सप्रमाण सिद्ध झाले असल्याने अ बरोबर ब बरोबर क म्हणजेच अ बरोबर क या सिद्धांतानुसार कोरोनावर योगाभ्यासातील हे दोन्ही प्रकार प्रभावी आहेत, तसेच त्यात कोरोनाचे विषाणू नष्ट करण्याची क्षमता असल्याची अनुभूती संपूर्ण विश्वाला आली असल्याचे मंडलिक यांनी नमूद केले.
फोटो
२०मंडलिक गंधार
---------------