लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : काश्मीर ते कन्याकुमारीचे अंतर विक्रमी वेळेत पूर्ण करण्याची ओमची कामगिरी समस्त युवावर्गासाठी, सायकलपटूंसाठी तसेच फिटनेसप्रेमींसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड यांनी केले.
नाशिक सायकलिस्ट् फाउंडेशनच्या वतीने अल्ट्रा सायकलिस्ट ओम महाजनचा सत्कार सोहळा व मिशन फॉर हेल्थ अंतर्गत स्टार सायकलिंग चॅलेंज यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या सायकलिस्टचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करणारा ओम हितेंद्र महाजन याचा सत्कार, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन करण्यात आला. ओमने "बी कुल -पेडल टु स्कूल " हा संदेश घेऊन, काश्मीर ते कन्याकुमारी राइड यशस्वी पूर्ण केली. यावेळी बोलताना बनसोड यांनी साहसी अनुभव विद्यार्थ्यांनी ऐकले, तर अन्य विद्यार्थ्यांना यापासून प्रेरणा मिळेल, असा विशासदेखील व्यक्त केला. तसेच प्रेरणादायी पुस्तक रूपी आदिवासी भागातील शाळांना भेट या अभिनव संकल्पनेचे आभार मानले. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल तसेच शालेय विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. या उद्देशाने नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला प्रेरणादायी पुस्तकांचा सेट वाचनालयासाठी दिला. ४२ पुस्तकांचा सेट त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे शाळेचे शिक्षक नामदेव बेलदार यांना, तर दुसरा सेट मनपा शाळा क्रमांक ३ नांदूर येथील शिक्षक गणेश लोहार यांच्याकडे सुपूर्द केला. प्रेरणादायी पुस्तकांची भेट हा उपक्रम आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नाशिक सायकली सातत्याने राबवणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. ओमने प्रवासादरम्यान आलेल्या, अनेक अडचणींवर मात करून कशाप्रकारे विजयश्री मिळवली. त्याचे अनुभव कथन केले, यावेळी सर्वांनी उभे राहून स्वयंस्फूर्तीने टाळ्यांचा गजर करीत ओमचे कौतुक केले. ओमच्या सपोर्ट टीममधील डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. नितीन रौंदळ, मनोज महाले, पूर्वाश लखवानी, सागर बोंदार्डे व मिलिंद वाळेकर यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या वाघ यांनी, तर आभार साधना दुसाने यांनी मानले.
इन्फो-०------
युनिटी राइडवीरांचा सन्मान
संदीप भानोसे ,चिन्मय नवले व मयुर कुलकर्णी यांनी नाशिक ते स्टॅच्यू ऑफ युनिटी ही युनिटी राइड पूर्ण केल्याबद्दल सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. गणेश लोहार यांनी मुलगा अथर्व व वेदांत सोबत नाशिक-कन्याकुमारी-नाशिक हा सायकल प्रवास २५ दिवसांत करून योगाचा प्रचार केला. त्यांचादेखील सत्कार करण्यात आला. तसेच ५ हजार कि.मी. स्टार सायकलिंग चॅलेंज यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सायकलिस्टचा सत्कार युवकांचा आयकॉन ओम महाजनच्या हस्ते करण्यात आला.