नाशिक : वारसा मोठा असेल तर प्रत्येकवेळी आधीच्या पिढीने केलेल्या कामगिरीशी तुलना केली जाते. त्या तुलनेत तुमची कामगिरी थोडी जरी कमी असली तरी वडिलांच्या कर्तृत्वापुढे फिका, अशा कॉमेंट्स आयुष्यभर ऐकाव्या लागतात. मात्र महान वारसा असूनही त्यापेक्षाही काकणभर सरस कामगिरी करुन दाखवली तर मात्र त्या युवकाचे नाव गौरवाने, अभिमानाने घेतले जाते. नाशिकच्या ओम महाजन याला वडील डॉ. हितेंद्र महाजन आणि काका डॉ. महेंद्र महाजन यांच्या सायकलिंगच्या विक्रमांचा मोठा वारसा लाभला. मात्र, ओमने त्या विक्रमी कामगिरीला आपल्या दोन विश्वविक्रमी मोहिमांचा साज चढवत खऱ्या अर्थाने महाजन ब्रदर्सच्या शिरपेचात अजून मानाची दोन मोरपिसे खोवली.
महाजन ब्रदर्स म्हणून प्रख्यात झालेल्या नाशिकच्या डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र या बंधूंनी भूतान, रेस अक्रॉस अमेरिका (रॅम) आणि देशाचा सुवर्ण चतुष्कोन अशा विक्रमी मोहिमा करीत नाशिकचे नाव देशात, विश्वात गाजवले. असा समर्थ वारसा लाभलेल्या अवघ्या १८ व्या वर्षांचा असताना ओमने काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर ८ दिवस ७ तास ३८ मिनिटांमध्ये पार करणाऱ्या पहिल्या विश्वविक्रमाची नोंद गतवर्षी केली होती. विशेष म्हणजे यापूर्वी भरत पन्नू यांनी ८ दिवस ९ तास ४८ मिनिटांत तर या मोहिमेसह प्रत्येक मोहिमेत बॅकबोन असलेले ओमचे काका डॉ. महेंद्र महाजन यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये हे अंतर १० दिवस ९ तासांत पूर्ण केले होते. या दोघांचा विक्रम ओमने मोडीत काढला होता. ही मोहीम पूर्ण करणारा तो जगातील सर्वांत कमी वयाचा सायकलिस्ट ठरला आहे. ओमने पाचवीपासून शाळेसह कॉलेजला जाण्यासाठी सायकलचा वापर केला होता. सर्व मुलांनी सायकल वापरावी, असा संदेश देण्यासाठी त्याने या अभियानाला ‘शाळेला सायकलने' हे घोषवाक्य देत एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
इन्फो
लेह ते मनालीची ४ गिरिशिखरे पादाक्रांत
त्यानंतर गत महिन्यात ओमने ‘लेह ते मनाली’ हे ४३३ किलोमीटर अंतर अवघ्या २७ तास ५५ मिनिटांत पार करून नवीन विश्वविक्रमाची नोंद केली. यापूर्वीचा या अंतराचा विश्वविक्रम सैन्यदलातील नाशिकचे अधिकारी भारत पन्नू यांच्या नावावर ३३ तासांचा होता. लेह ते मनाली या मार्गावर तब्बल ४ मोठी गिरिशिखरे पादाक्रांत करीत त्याने ही विश्वविक्रमी कामगिरी नोंदवली होती.
फोटो
२८ ओम महाजन