वडनेर : मोसम खोऱ्यातील मानाचा असलेला वडनेर येथील ओम साई मित्रमंडळाच्या वतीने २००९ पासून सलग अकरा वर्षांपासून राबविण्यात येणारी ‘एक गाव एक गणपती’ परंपरा अद्यापही कायम आहे.
यंदाही वडनेर ‘गावात एक गाव एक गणपती’ या उपक्रमांतर्गत बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. बाप्पाची भव्य आकर्षक मूर्ती भाविकांचे आकर्षण ठरत आहे. यावेळी नियमांचे काटेकोर पालन करत, साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे ओम साई मित्रमंडळाच्या वतीने ठरविण्यात आले आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘एक गाव एक गणपती’ या सन्मानाचे सलग तालुकानिहाय जिल्हानिहाय मानकरी ठरले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वडनेर गावात ओम साई मित्र मंडळाच्या वतीने एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात येत आहे. आकर्षक भव्य गणेश मूर्ती, सजावट, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवत परिसरातील वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यामुळे प्रतिवर्षी परिसरातून गणेशोत्सवाच्या काळात मोसम खोऱ्याचा राजाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी असते. सर्व जातीधर्मातील नागरीक एकत्र येत सामाजिक एकतेचे दर्शन घडवून देतात.
विविध सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक एकतेचा संदेश देण्यात येतो, तसेच चिमुकल्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात, तसेच विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात, यामध्ये भागवत कथा, प्रवचन, कीर्तने, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे, रक्तदान शिबिर, पर्यावरणाची जागृती करणारे ओझोन थराविषयी माहिती देणारी दृश्य सजावट करण्यात येते. यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिक हजेरी लावत असतात. ढोल-ताशांच्या गजरात निघणारी मिरवणूक आकर्षण ठरत असते, परंतु यंदा कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.
कोट...
कोरोना नियमाचे पालन करत, यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. विविध सामाजिक, धार्मिक व पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम राबविण्यात येत असतात, परंतु यंदा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
- लोकेश चौधरी, अध्यक्ष, ओम साई मित्रमंडळ, वडनेर.