नाशिक : कोरोनानंतर नवीन ओमायक्रॉनच्या विषाणूमुळे जगभराची चिंता वाढविली असताना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेगही वाढविण्यास शासनाने गती दिली आहे. नाशिक जिल्ह्याने याकामी आघाडी घेतली असून, दिवसा व रात्री जेव्हा नागरिकांना लस घेण्यासाठी सवड मिळेल त्यावेळी लस देण्याची तयारी दर्शविल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७८ टक्के लसीकरण पूर्ण होेऊ शकले आहे.
नाशिक जिल्ह्यात १९०७ गावे असून, त्यातील २२२ गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. अजून १७०० गावे शिल्लक असली तरी, यातील बहुतांशी गावांमधील सुमारे ७८ टक्के नागरिकांना लसीचा एक डोस देण्यात आला असून, दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २६ टक्के इतकी आहे. विशेषत: आदिवासी भागातील नागरिकांची उदासीनता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने थेट त्यांच्या घरापर्यंत लसीकरण करण्याची योजना आखली असून, याशिवाय दिवसभरातील त्यांच्या कामांचा खोळंबा होऊ नये म्हणून रात्रीचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
५१७५८८९- अठरा वर्षांपुढील लोकसंख्या
३८१३८६४- पहिला डोस घेतलेले
१६५३८५९- दुसरा डोस घेतलेले
तालुक्याची आकडेवारी काय सांगते?
तालुका- पहिला डोस - दुसरा डोस- शंभर टक्के
* बागलाण- ७५- २९- ७७
* देवळा- ७७- ३५- ८३
* दिंडोरी- ८६-२८-८४
* इगतपुरी- ७८- २८- ७८
* कळवण- ७६-२८-७६
* नाशिक- ८८-४०-९४
* पेठ- ७८-२०-७२
* सुरगाणा- ६३-१६-५८
* त्र्यंबक- ८०-२१-७४
* चांदवड-८०-२६-७८
* मालेगाव-७८-२९-७९
* नांदगाव- ६९-२२-६७
* निफाड- ८०-३१-८२
* सिन्नर- ८१-३५-८६
* येवला- ७४-२२-७१
रात्रीच्या वेळीही लसीकरण
* जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची शेतीची कामे लक्षात घेता ते सकाळीच घराबाहेर पडून सायंकाळी उशिरा परतत असल्यामुळे रात्रीचे लसीकरण केले जात आहे.
* रात्रीच्या लसीकरणासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.
विदेशातून कोणी आला तर क्वारंटाइन
* कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉनच्या विषाणूने साऱ्यांचीच धास्ती वाढविली असून, नाशिक जिल्ह्यात शिर्डी, ओझर व मुंबई या तीन विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणारे प्रवासी येऊ शकतात. त्यादृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे.
* परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांची यादी घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे.
लसीकरणाचा वेग जोरात
जिल्ह्यात लसीकरणाने पुन्हा वेग घेतला असून, लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे दिवस-रात्र तसेच आरोग्य केंद्रांपासून ते थेट नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन आरोग्य कर्मचारी लसीकरण करीत आहेत. नागरिकांचाही त्याला चांगला प्रतिसाद आहे.
- डॉ. कैलास भोये, लसीकरण समन्वयक