नाशिक- नवीन रेशनकार्ड मिळाले म्हणजे लागलीच धान्य मिळायला सुरुवात झाली असे नाही. याबाबतची माहिती कार्डधारकांना माहितीच नसल्याने अनेक कार्डधारक धान्यापासून वंचित आहेत. कार्डधारकांची माहिती ऑनलाईन अपलोड झाल्याशिवाय त्याला रेशनचे धान्य मिळणे शक्यच नाही. मात्र अनभिज्ञता आणि तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईनला येणारी वारंवार अडचण यामुळे असंख्य कार्डधारक अजूनही रेशनच्या धान्याच्या प्रतीक्षेत आहेत.
नवीन कार्ड असले तरीही त्यांना आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला ऑनलाईन अपलोड करावा लागतो. त्यासाठी पुरवठा विभागाकडे अर्ज करून ऑनलाईन प्रक्रिया करावी लागते. परंतु याबाबतची माहितीच नसल्याने नवीन रेशनकार्डधारक धान्यासाठी चकरा मारत आहेत.
जिल्ह्यात किती कार्डधारक
अंत्योदय: १,७२,३४८
बीपीएल: ५,८५,३५१
केशरी: ४,७०,६२९
धान्य मिळेना, रेशनकार्ड काय कामाचे?
रेशनकार्ड काढूनही काहीही उपयोग झाला नाही. गेल्या सहा महिन्यांपासून दुकानच मिळाले नाही. दुकानदार म्हणतात ऑनलाईन नोंदणी करावी लागले. परंतु पुरवठा कार्यालयात गेले की, साईट बंद असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हातात फक्त रेशनकार्ड मिळाले, रेशन काही मिळत नाही. - मालतीबाई हाके, कार्डधारक
धान्य नाही, तर नवे रेशनकार्ड कशासाठी?
अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शिबिरे घेऊन ग्राहकांना रेशनकार्ड मिळवून दिले. अनेकांच्या हाती रेशनकार्ड पडले आहेत. परंतु त्यांना अजूनही धान्य सुरू झालेले नाही. त्यामुळे नवीन रेशनकार्डधारक व्यवस्थेविषयी नाराजी व्यक्त करीत आहेत. कार्ड देतानाच सर्व प्रकारची कागदपत्रे घेतली तेव्हाच ऑनलाईन प्रक्रिया केली असती तर, धान्य मिळाले असते. अशीच प्रक्रिया असेल तर, मग कार्ड ऑनलाईन नोंदणी शिवाय देण्यात काय मतलब असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
ऑनलाईन करणे आवश्यक
नवीन रेशनकार्ड मिळाले म्हणजे लागलीच धान्य मिळते असे नाही तर, त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. तशी व्यवस्था पुरवठा विभागाकडून करण्यात आलेली आहे. रेशनकार्ड ऑनलाईन झाल्याशिवाय रेशनवरील धान्य मिळण्यास पात्र ठरत नाही. त्यामुळे नवीन रेशनकार्डधारकांनी ऑनलाईन नोंदणी करावी.
- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी.