नाशिक (सुयोग जाेशी): शहरातील महापालिकेच्या आरोग्यवर्धिनींचा विषय विधिमंडळात गाजल्यानंतर आरोग्य यंत्रणा जागी झाली असून येत्या महिनाअखेर ३० आरोग्यवर्धिनी व १६ आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेने १०६ पैकी ४७ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरु केली असली तरी यातील बहुतांश केंद्रे मनुष्यबळाअभावी अर्धवट अवस्थेत असल्याने त्याचा रुग्णांना फायदा होताना दिसत नाही. शिवाय या आरोग्यवर्धिनी आचारसंहितेत सापडल्या होत्या.
१५ वा वित्त आयोगातून केंद्र शासनाच्या या योजनेबाबत व मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षाविषयी आ. सीमा हिरे यांनी विधीमंडळात लक्षवेधी मांडली. या केंद्रांच्या दिरंगाईविषयी हिरे यांनी महापालिकेला जाब विचारला. निधी असूनही गेल्या दोन वर्षांपासून आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पणाच्या दिरंगाईविषयी आमदारांनी मनपाला जाब विचारला आहे. लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी महापालिकेने घाईगर्दीत ४७ आरोग्य केंद्र प्रायोगिक केंद्रे सुरू करण्यात आल्याचे सांगितले; मात्र त्यातील अनेक केंद्रांसाठी उत्तर देण्याची सूचना दिली आहे. १०६ पैकी केवळ चुंचाळे शिवारात पहिले आरोग्यवर्धिनी केंद्रात डॉक्टर, स्टाफ नर्स, आरोग्यसेवक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
येत्या महिनाभरात ३० आरोग्यवर्धिनी केंद्र व १६ आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे. आरोग्यवर्धिनीसाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने जागा उपलब्ध करून दिल्या असून आपला दवाखानासाठी भाडेतत्वावर जागा घेण्यात येणार आहे.-डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य अधिकारी, मनपा