-संदीप झिरवाळ
नाशिक- बलिप्रतिपदेनिमित्त आज नाशिक शहरातील पंचवटीसह अन्य गावठाणात परंपरेनुसार यंदाही ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करून रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात (पाडवा) बलिप्रतिपदेला नाशिक शहरात विशेषतः पंचवटीत रेडयांची सवाद्य मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत फटाके वाजवून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नागरिक व गोठे धारक दुग्ध व्यवसायिक शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते. दिंडोरीरोड म्हसोबा महाराज मंदिर येथे रेड्यांची मिरवणूक व रेड्यांना दर्शनासाठी आणल्याने रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती.
कोरोना महामारीमुळे शासनाने सर्व सण व सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले होते. मात्र आता कोणतेही निर्बंध नसल्याने रेड्यांची मोठ्या उत्साहात मिरवणूक पार पडली. रेडयांना आकर्षक सजावट करून त्यांच्या पाठीवर जय श्रीराम, रुद्रा तर काहींनी सामाजिक संदेश लिहिण्यात आले होते. रेडयांच्या पाठीवर काढलेले देवदेवतांचे चित्र रेखाटण्यात आले होते.