बेरीज -वजाबाकी
मिलींद कुलकर्णी
शिक्षण, सहकार क्षेत्रात राजकीय जोडे बाहेर काढून यावे, पक्षीय राजकारण आणू नये, महाराष्ट्राची ही परंपरा आहे...अशी विधाने सामान्य नागरिकांच्या तोंडावर फेकली जात असली तरी त्या विधानात कितपत तथ्य आहे, याची पुरेशी कल्पना विधान करणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्या दोघांनाही असते. त्यामुळे ही विधाने फारशी मनावर घेतली जात नाही. रयत शिक्षण संस्थेपाठोपाठ लौकिक आणि विस्ताराच्या दृष्टीने राज्यात क्रमांक दोनवर असलेल्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत याचा पुन्हा प्रत्यय आला. पंधरवड्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे नाशिक मुक्कामी आले असताना दोन्ही गटांच्या नेत्यांनी भेटून त्यांचा आशीर्वाद घेतला. दोन्ही पॅनलने सर्वपक्षीय नेत्यांना, त्यांच्या नातेवाईकांना तसेच समर्थकांना उमेदवारी दिलेली आहे. माणिकराव कोकाटे, बाळासाहेब क्षीरसागर, नानासाहेब महाले, केदाजी आहेर, संदीप गुळवे यांच्यासह सक्रिय प्रमुख राजकीय नेते, पदाधिकारी उमेदवारी करीत आहेत. सर्व पक्षीयांना समान न्याय देऊन कोणाचीही नाराजी होणार नाही, असा प्रयत्न केलेला दिसतो.
पुन्हा एकदा नीलिमा पवार
मविप्र संस्थेत सरचिटणीस हे पद घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असते. अध्यक्ष, सभापती या पदांपेक्षा सरचिटणीस हा संस्थेचा चेहरा असतो. त्यामुळे या पदासाठी रस्सीखेच अपेक्षित असते. नीलिमा पवार यांनी बारा वर्षे सरचिटणीस म्हणून कार्य केले. प्रकृतीच्या कारणास्तव त्या पुन्हा हे पद स्वीकारणार नाही, अशी चर्चा होती. मात्र ती फोल ठरवत त्याच उत्साहाने त्या निवडणुकीला सामोरे गेल्या आहेत. पॅनलचे गठन करण्यासाठी धोरणीपणा, चातुर्य दाखवत चांगला चमू निवडला आहे. जुन्या संचालकांना स्थान देत असताना धक्कातंत्र वापरत काहींना पदोन्नती तर काहींना डच्चूदेखील दिला आहे. संस्थेची झालेली सर्वांगीण प्रगती हाच त्यांच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. शिस्त, गुणवत्ता आणि पारदर्शकता या मूल्यांवर कार्य करताना सभासद पुन्हा विश्वास दाखवतील, असा आशावाद त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना आहे.
नितीन ठाकरे लढवतायत किल्ला
मविप्र निवडणुकीत परिवर्तन घडविण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेले ॲड. नितीन ठाकरे यांनी पॅनल नियोजनपूर्वक तयार केल्याचे दिसून येत आहे. व्यवसायाने वकील असलेल्या आणि वकील संघटनेचे अध्यक्ष असलेल्या ठाकरे यांनी मोठा गोतावळा जमवलेला आहेच, त्याचा लाभ या निवडणुकीत मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने थेट आमदारांना त्यांनी अध्यक्ष म्हणून मैदानात उतरवले आहे. बाळासाहेब क्षीरसागर हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. संदीप गुळवे हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. त्यांना वडिलांचा मोठा वारसा आहे. नातेगोते, तालुक्यातील मतदानाचे गणित बघून त्यांनी पॅनलची निर्मिती केली आहे. सत्ताधारी पॅनलच्या बारा वर्षांच्या कार्यकाळातील उणिवा, दोष यांच्यावर बोट ठेवत असतानाच नाराज झालेल्या सभासदांना हेरून पॅनलमध्ये घेण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केलेला दिसतोय. ठाकरे यांच्याकडेदेखील इच्छुकांची गर्दी होती. परंतु, स्पर्धकांच्या तुलनेत मातब्बर ठरणारा उमेदवार देण्यासाठी त्यांनी धाडसी निर्णय घेत काहींना उमेदवारी नाकारली आहे. सरळ लढतीत चुरशीची अपेक्षा आहे.
नात्यागोत्याचा मोठा प्रभाव
मविप्र ही समाजाच्या धुरिणांनी स्थापन केलेली आणि प्रगतीपथावर नेलेली शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या उत्कर्षासाठी तन-मन-धनाने कार्य केलेले अनेक महात्मे होऊन गेले. आयुष्य खर्ची घालणाऱ्या या थोरपुरुषांमुळे संस्थेला हे वैभवाचे दिवस आले आहेत. शेतकरी, शेतमजुरांची मुले उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरी, व्यवसाय करू लागले. अनेक पिढ्या या संस्थेने घडविल्या. अनेकांनी स्वत:ची जमीन, मालमत्ता संस्थेला दान केली. त्या कुटुंबातील पिढ्या आजदेखील संस्थेच्या कारभारात सक्रिय आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नात्यागोत्याचे राजकारण मोठे असते. दोन्ही पॅनल या प्रमुख घराण्यांच्या सदस्यांना आपल्या पॅनलमध्ये घेण्याचा प्रयत्न करतात. यंदाही तो झाला आहे. त्यांच्याकडे पाहून मतदार मतदान करतात, हेदेखील वास्तव आहे. त्यामुळे प्रभावशाली उमेदवार ज्या पॅनलकडे आहेत, त्यांची सत्ता येते हा आजवरचा इतिहास आहे. यंदादेखील त्याला अपवाद राहणार नाही, असे वाटते.
निफाड तालुक्याचे राहणार वर्चस्व
मविप्र निवडणुकीत दहा हजार १९७ मतदार असले तरी सर्वाधिक २९०३ मतदार हे निफाड तालुक्यातील आहेत. त्यामुळे इतर तालुक्यांपेक्षा निफाड तालुक्याला संस्थेच्या दृष्टीने आणि निवडणुकीच्या दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रगती आणि परिवर्तन या दोन्ही पॅनलनेदेखील उमेदवारी आणि प्रचाराच्या नियोजनाच्यादृष्टीने याच तालुक्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सटाणा, नाशिक शहर, दिंडोरी-पेठ, मालेगाव, नाशिक ग्रामीण, चांदवड, देवळा, सिन्नर या तालु्क्यांत हजाराच्या आसपास सभासद संख्या आहे. कळवण-सुरगाणा, नांदगाव, इगतपुरी, येवला या तालुक्यांमध्ये तुलनेने कमी मतदार आहेत. त्यामुळे या ठिकाणचे उमेदवार आणि त्या तालुक्यांवर दोन्ही पॅनलचा असलेला जोर देखील कमी आहे. एकूण २४ जागांसाठी मतदान होत आहे. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सभापती, उपसभापती तसेच १३ तालुका संचालक, तीन शिक्षक संचालक व दोन महिला संचालकांचा समावेश आहे. पाच वर्षे कार्यकाळ असलेल्या पदाधिकारी निवडीसाठी २८ ऑगस्टला मतदान होईल. दुसऱ्या दिवशी मतमोजणी होईल. आरोप-प्रत्यारोपांचा उडणार धुराळा
दोन्ही पॅनलचे चित्र स्पष्ट झाले आणि प्रचाराचा नारळ फुटला. दोघांनीही जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. नीलिमाताई पवार या १२ वर्षांत संस्थेने केलेल्या प्रगतीवर भर देत आहेत. त्यांच्या प्रचाराच्या मुद्द्यात एकूण उलाढालीत २० टक्के वाढ, अंदाजपत्रक ३८७ कोटींवर ८०१ कोटींवर पोहोचले, २९४ कोटींची बांधकामे, ५० नवीन इमारती, १३७ नव्या शाखा, २१६३ सेवक नव्याने रुजू, वेतन खर्च २४ कोटींवर १३३ कोटी, विद्यार्थिसंख्येत २९ हजारांची वाढ यांचा समावेश आहे. संस्थेत परिवर्तन घडविण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या ॲड. नितीन ठाकरे यांच्याकडून विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या उणिवा, दोष यावर बोट ठेवले जात आहे. हुकूमशाही कारभार, सभासदांना अपमानास्पद वागणूक, कोविड काळात वैद्यकीय महाविद्यालयाची खराब कामगिरी, समाजबांधवांऐवजी अन्य उमेदवारांना संधी असे मुद्दे मांडले जात आहे. आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडायला सुरुवात झाली आहे. सभासद हे सुज्ञ, विवेकी असल्याने ते योग्य अशा कारभारींची निवड करतील.