नायगाव: शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी मदती बरोबरच शेतकऱ्यांचे कांदा अनुदानही लांबल्यामुळे नायगाव खो-यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शासनाने जाहीर केलेले अनुदान लवकरात लवकर देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम डोमाडे यांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने दुष्काळी मदतीची घोषणा करून बळीराजाला दुष्काळात दिलासा देण्याचा प्रयत्न केला.मात्र जाहीर केलेली मदत अजुनही शेतकºयांना मिळाली नाही. तसेच प्रतिकुल परिस्थतीत पिकविलेल्या शेती मालास बाजारात मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांना दुष्काळी मदती पाठोपाठ कांदा पिकास प्रती क्विंटल दोनशे रूपये अनुदान जाहीर केले. मात्र सहा महिने होऊनही शेतकरी अजुनही या अनुदानाच्या प्रतिक्षेतच आहे. यंदा भीषण दुष्काळी परिस्थती निर्माण झाल्याने शेतकरी पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चा-याच्या टंचाईमुळे हैराण झाले आहे. वर्षभर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दुष्काळी मदत व कांदा अनुदानाची रक्कम अजूनही मिळाली नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या हैराण झालेल्या शेतकºयांना शासनाने जाहीर केलेली मदत लवकरात लवकर बँक खात्यावर जमा करण्याची मागणी देशवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम डोमाडे यांच्यासह नायगाव खो-यातील शेतक-यांनी केली आहे.
कांदा अनुदानापासून नायगाव खोऱ्यातील शेतकरी वंचीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 2:12 PM