पंचवटी : आडगाव शिवारातील स्वामी नारायणनगर येथे असलेल्या एका कुरिअर कंपनीच्या ऑफिसचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून दीड लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोमवारी (दि.३१) चोरट्यांनी औरंगाबाद रोडवरील स्वामीनारायण नगर येथे असलेल्या नक्षत्र इमारतीमधील डिलिव्हरी लिमिटेड नावाचे कुरिअरचे कार्यालय चोरट्यांनी फोडले. बंद कार्यालयाचे शटर वरच्या बाजूस उचकटून चोरांनी आत प्रवेश केला. लॉकरमध्ये ठेवलेली सुमारे दीड लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. चोरट्यांना हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर यंत्रणाही चोरी केली. यामुळे पोलिसांपुढे या गुन्ह्याच्या तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. फिर्यादी अबरार मुजफ्फर खान (रा. वडाळारोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.