नाशिक : एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या आणि बळींच्या संख्येत कमालीच्या वेगाने भर पडत गेली आहे. दिवसाला सरासरी ४ ते ५ हजारांदरम्यान बाधितांची भर पडू लागल्यानंतर मंगळवारी तर कोरोना बळींचा ३२ इतका उच्चांक नोंदला गेला. अवघ्या आठवडाभरात १५० हून अधिक बळी ही स्थिती झाल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये नाशिकदेखील अव्वल पाचात पोहोचले आहे.
कोरोनाचा प्रकोप नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक वेगाने पसरू लागला आहे. नाशिक महानगरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. त्यामुळेच आता बाधितांसह मृतांच्या संख्येतही ग्रामीण भाग शहरी क्षेत्राच्या बरोबरीला आल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचा इतका प्रकोप वाढूनही जिल्हा शल्यचिकित्सकांकडून ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटरच्या वापराबाबत अनास्था दिसून आल्यामुळेच या आठवड्यात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई करण्यात आली. एकीकडे बेड कमी पडणे, व्हेंटिलेटरअभावी जीव गमावणे, असे प्रकार घडू लागले असून त्यात आता रेमडीसिवीरचा तुटवडादेखील रुग्णांच्या जीवावर उठू लागला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात गत महिनाभरात १५ टक्क्यांहून अधिक घट होऊन ते प्रमाण ९८ टक्क्यांवरून ८३ टक्क्यांच्या खाली आले आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या २ लाखांवर, तर आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या २५०० वर पोहोचली आहे. गत सप्टेंबरनंतर जिल्ह्यात सर्वाधिक बाधित आणि बळी हे मार्च आणि एप्रिल महिन्यातच दिसून येत असून हा आकडा एप्रिलअखेरपर्यंत अजून मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती प्रशासनाला वाटू लागली आहे. जिल्ह्यात लसीकरण सुरू असले, तरी लसींचा साठाच नियंत्रित स्वरूपात उपलब्ध होत असल्याने लसीकरणाच्या वेगावरही काहीशा मर्यादा आहेत.
----------------------
जिल्ह्यातील एकूण बाधित - २ लाख ७ हजार ६६४
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - १ लाख ७२ हजार ९६७
जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्ण - ३२ हजार १६८
जिल्ह्यातील एकूण बळी - २५२९
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८३.२९
जिल्ह्यातील एकूण लसीकरण - ३ लाख १ (पहिला डोस), ३७ हजार ४८६ (दुसरा डोस)
------------------
हे ग्राऊंड रिपोर्टसाठी आहे.