पंचवटी : नवीन आडगाव नाक्यावरील बँक ऑफ बडोदा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचे एटीएम कार्ड हातोहात बदलून खात्यातून सुमारे एक लाख ५६ हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याची घटना नवीन आडगाव नाक्यावरील ओमनगर येथे असलेल्या बँक ऑफ बडोदा एटीएम केंद्रात घडली. याबाबत बदलापूर येथे राहणारे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी बाळकृष्ण रामचंद्र मुसळे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
बदलापूरला राहणारे मुसळे सून बाळंतीण झाल्याने तिला बघायला अहिरराव हॉस्पिटलला आले होते. दवाखान्यात पैसे लागतील यासाठी मुसळे रविवारी सकाळी ओमनगरला बँक ऑफ बडोदा एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना पैसे काढता येत नसल्याने त्यांनी एटीएमबाहेर उभ्या असलेल्या इसमाला पैसे काढून देण्यासाठी मदत करा, असे सांगितले. तेव्हा मुसळे यांनी एटीएम टाकून पिन टाकला; मात्र एटीएममध्ये पैसे नसल्याने मुसळे निघून गेले.
दुसऱ्या दिवशी मंगळवारी मुलाने फोन करून पुन्हा पैसे काढले का, याची चौकशी केल्यावर मुसळे यांनी पैसे काढले नसल्याचे सांगितले. त्यावर रवींद्र याने तुमच्या स्टेट बँक इंडिया बदलापूर शाखेतील खात्यावरील पैसे काढून घेतल्याचे सांगितले. ज्या व्यक्तीने एटीएम बदलले त्याने त्याच्याकडील कृष्णदेवसिंग एच झाला नावाचे कार्ड मुसळे यांना देत मुसळे यांचे कार्ड वेगवेगळ्या एटीएममध्ये वापरून त्यातून सुमारे एक लाख ५६ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली.