नाशिक: केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. अशा पेन्शनधारक ज्येष्ठांना टपाल विभागाने घरपोच हयातीचा दाखला दिला आहे. गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यातील दीड हजार ज्येष्ठ नागरिकांना हयातीचा दाखला घरबसल्या मिळाला आहे.
पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बँकांमध्ये तसेच ग्राहक सेवा केंद्राकडे ह्यातीचा दाखला सादर करावा लागतो. यासाठी त्यांना संबंधित बँकेत किंवा केंद्राकडे प्रत्यक्ष हजर रहावे लागत होते. लॉकडाऊनच्या काळात अनेक ज्येष्ठांना प्रत्यक्षात बँकांमध्ये उपस्थित राहाता आले नाही. त्यामुळे त्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली. ही अडचण लक्षात घेऊन ग्राहकांना हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
ज्येष्ठांना दाखल्यासाठी बराचसा कालावधी मिळाला असला तरी शारीरिक क्षमता आणि अन्य काही कारणांमुळे ज्येष्ठांना प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही अशा ज्येष्ठांना टपाल खात्याच्या योजनेचा लाभ झाला. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून घरपोच ‘जीवन प्रमाणपत्र’देण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनर पोस्टमन किंवा जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.
जीवन प्रमाणपत्रासाठी टपाल विभागाने ऑनलाइन नोंदणीची सुविधादेखील दिलेली आहे. ‘पोस्टइन्फो’ॲपच्या माध्यमातून सर्व्हिस रिक्वेस्टपर्यंत यातून प्रमाणपत्रासाठी ज्येष्ठांना नोंदणी करता येते. आधार संलग्न येाजना असल्यामुळे आपल्या भविष्यनिर्वाह निधी खात्याला आधार कार्ड लिंक असणे आशव्यक असून, पेन्शन वितरण करणारी संस्था जीवन प्रमाण डिजिटल स्वरूपात स्वीकारत आहे.