नाशिक : बनावट प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरीचा लाभ घेणाऱ्या बोगस खेळाडूंसह संबंधित खेळाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नाशिकमधील ‘सेपक टकरा’ या खेळातील संघटनेच्या एका क्रीडा पदाधिकाऱ्यास अटक झाल्याच्या चर्चेेने क्रीडा वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बोगस प्रमाणपत्र देऊन खेळाडूंना शासकीय नोकरीचा लाभ मिळवून दिल्याप्रकरणी राज्य शासनाच्या क्रीडा आणि युवक संचलनालयानाच्यावतीने पुण्यातील हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये दोन महिन्यापूर्वीपासून तक्रार दाखल केली होती. संचलनालयाचे क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांनी शासनाच्यावतीने ही तक्रार दाखल करण्यात आली होती. अखेर या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी सेपक टकरा खेळाच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. बोगस खेळाडूंना नोकरी देण्यात आल्याचे कळल्याने त्या पार्श्वभूमीवर अन्याय झालेल्या खेळाडूंनी वर्षभरापूर्वी क्रीडा आयुक्तांकडे तक्रार दाखल करुन या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार झालेल्या चौकशीनंतर प्रथम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान यानंतर संबंधित बोगस खेळाडूंवरही कारवाई होण्याची चिन्हे आहेत.
--इन्फो---
तब्बल ६ बोगस प्रमाणपत्रे
नाशिकमधील सेपक टकरा या खेळाच्या राज्य स्पर्धेत न खेळलेल्या ६ पेक्षा अधिक खेळाडूंना सहभागाची बोगस प्रमाणपत्रे देण्यात आली होती. या प्रमाणपत्राच्या आधारे खेळाडूंचा पाच टक्के आरक्षणांतर्गत संबंधित व्यक्तींनी सरकारी नोकरी प्राप्त केली. मात्र, त्या खेळातील खेळाडूंनी गुन्हा दाखल केल्याने या सर्व प्रकाणाचा उलगडा झाला आहे.