नामदेव भोर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : महाराष्ट्र राज्यात विक्री, साठा, वितरण, उत्पादन व वाहतूक करण्यासाठी बंदी असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखु विक्रीकरण्यासाठी जवळ बाळगणाऱ्या संशयित वैभव दिलीप भडांगे याला नाशिक शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेत कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. आडगाव शिवारात जत्रा हॉटेल ते नांदुर नाका रोड परिसरात कुंदन हॉटेल समोरील रोडवर गुरुवारी (दि.६) अडीच वाजेच्या सुमारास संशयित वैभव दिलीप भडांगे ( २४, वडजाई ) पांढरे रंगाच्या छोट्या टेम्पोसह सुमारे ४ लाख १५ हजार ३३३ रूपये किंमतीचा राज्यात प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखु विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे आढळून आले. त्याने अब्दुल रहमान उर्फ राहिल मेहमुद फारूकी, ( ३४, रा. मोतीसुपर मार्केट,भक्तीधाम मंदिरासमोर, पेठ रोड, पंचवटी) याच्याकडुन हा माल विकत घेतला होता. विशेष म्हणजे राज्यात विक्री, साठा, वितरण, उत्पादन व वाहतूक करण्यासाठी बंदी व मानवी सेवनास अपायकारक असतांनाही हा पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्री करण्यासाठी त्याने जवळ बाळगल्याचे पोलिसांना आढळून आल्याने पोलिसांनी प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखु जप्त केली असून संशयिताविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"