---------------------
तीन हजारांचा भ्रमणध्वनी लंपास
मालेगाव : शहरातील उस्मानपूरा भागात राहणाऱ्या तौकीद अहमद अशपाक अहमद याने चार्जिंगसाठी लावलेला भ्रमणध्वनी पुढे आमीन पुरी यांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार एन. टी. आव्हाड करीत आहेत.
-------------------------
छावणीच्या हद्दीतून दोन दुचाकी लंपास
मालेगाव : शहरातील छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. दुचाकी चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरून तसेच मंडाळे बागेतून अज्ञात चोरट्यांनी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मन्साराम देवचंद सोनवणे यांनी दुचाकी क्रमांक एम. एच. १८, एच. एच. २९२२ उभी केली होती. ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आखाडे करीत आहेत. तर मंडाळे भागात राहणारे दिलीप सटवाजी गवळे यांची दुचाकी क्रमांक एम. एच. ४१, ए. डी. ३२७४ ही घरासमोर उभी असताना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
------------------
रोटरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू
मालेगाव : शहरातील भागातील गोविंदनगर येथे मोकळ्या जागेत रोटर मारत असताना विलास ज्ञानदेव ह्यालीज याचा पाय रोटरमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला नातेवाईकांनी सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टर मुस्तफा यांनी मृत घोषित केले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास हवालदार के. एल. गरुड करीत आहेत.