सिन्नर: तालुक्यातील दोडी येथील कोरोना बाधित रूग्णाच्या निकट संपर्कात आल्याने भोकणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील खोलीत क्वारंटाईन असलेल्या ५७ वर्षीय इसमाने भीतीपोटी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.जाखु बाळू मेंगाळ (५७) असे सदर मृत व्यक्तीचे नाव आहे. मेंगाळ हे कावीळ या आजारावर गावठी औषध देण्यासाठी परिसरात प्रसिद्ध होते. १० जून रोजी दोडी येथील कोरोना बाधित असल्याचा अहवाल आलेली व्यक्ती त्यांच्याकडे काविळीचे औषध घेण्यासाठी आली होती. या व्यक्तीला कोरोना झाल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाल्यावर तिच्या निकट संपर्कात आलेल्या मेंगाळ यांना १३ जून पासून कुटुंबातील १२ व्यक्तींसमवेत भोकणी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. तेव्हापासून हे संपूर्ण कुटुंब तेथेच वास्तव्याला होते. मंगळवारी सकाळी शाळेच्या एका खोलीत मेंगाळ यांचा दोरीने गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. सकाळी शाळेत तपासणीसाठी आलेल्या कोतवालाच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याने कुटुंबातील इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली. बाजार समितीचे माजी सभापती अरु ण वाघ यांनी वावी पोलीस ठाण्यात व देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक रणजीत गलांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विधाते यांनी घटनास्थळी भेट दिली. मेंगाळ यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी दोडी येथील ग्रामीण रु ग्णालयात पाठवण्यात आला. कोरोना बाधित रु ग्णाच्या संपर्कात आल्यामुळे आपल्याला देखील कोरोना ची बाधा झालेली असू शकते या भीतीपोटी त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोरोनाच्या भीतीने एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 1:19 PM