एक तक्रार अन् कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात; दिघोळे-कोकाटे यांच्यातील राजकीय संघर्षाची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:36 IST2025-02-21T13:36:00+5:302025-02-21T13:36:47+5:30
राज्यमंत्री दिघोळे यांना पहिली विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या कोकाटे यांनी सुमारे २० हजार मतांनी पराभूत केले होते.

एक तक्रार अन् कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात; दिघोळे-कोकाटे यांच्यातील राजकीय संघर्षाची कहाणी
शैलेश कर्पे, सिन्नर : सिन्नर विधानसभा मतदारसंघाला स्वर्गीय तुकाराम दिघोळे यांच्या रूपाने राज्यमंत्रिपद मिळाले होते तर आता माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने तालुक्याला प्रथमच कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. सिन्नरच्या राजकारणात मंत्रिपदापर्यंत पोहोचलेल्या उभय नेत्यांमधला राजकीय प्रवास कधी मैत्रीचा सुगंध देणारा तर कधी पराकोटीचा संघर्ष करणारा आणि शेवटी गोडवा देणारा ठरला. मात्र, गुरुवारी न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे तुकाराम दिघोळे यांच्या पश्चात कोकाटे यांना मात्र या निकालाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला एकप्रकारे आव्हानच उभे केले आहे.
१९८५ साली तुकाराम दिघोळे समाजवादी काँग्रेसकडून आमदार झाले, त्यावेळी माणिकराव कोकाटे अतिशय युवा कार्यकर्ते होते. कोकाटे काँग्रेसचे विचाराचे असल्याने या निवडणुकीत त्यांनी दिघोळे यांच्या विरोधात काम केले होते. पुढे समाजवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेस पक्षात विलीन झाल्यानंतर कोकाटे आणि दिघोळे एकत्र आले. १९९०च्या निवडणुकीत कोकाटे यांनी दिघोळे यांचा प्रचार केला. दिघोळे दुसऱ्यांदा आमदार झाले. पूर्व भागातील मराठा युवा कार्यकर्ता मिळाल्याने दिघोळे-कोकाटे मैत्री फुलली. याच काळात कोकाटे यांना दिघोळे यांच्या शिफारसीवरूनच मुख्यमंत्री कोट्यातून विसे मळा याठिकाणी सदनिका मिळाल्याची चर्चा होती. १९९२च्या जिल्हा परिषद निवडणुकीत माणिकराव कोकाटे काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य झाले आणि सिन्नर पंचायत समितीचे सभापती झाले. कोकाटे यांनी जिल्हा परिषदेचे कृषी सभापतिपदही मिळविले. या काळात कोकाटे यांचा संपर्क अॅड. भगीरथ शिंदे यांच्यासोबत जवळून आला. १९९५ ला दिघोळे यांनी अपक्ष उमेदवारी लढवली तर कोकाटे यांनी भगीरथ शिंदे यांना मदत केली. कोकाटे पंचायत समितीचे सभापती असताना दिघोळे यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. कोकाटे यांनी पंचायत समितीच्या सभापतिपदाचा राजीनामा न दिल्याने त्यांच्यावर अविश्वास आणला गेला. दिघोळे यावेळी युती सरकारमध्ये राज्यमंत्री होते. कोकाटे यांनी बाबूराव आव्हाड नामक पंचायत समिती सदस्य यांना अज्ञातस्थळी हलवून अविश्वास ठराव फेटाळून लावला. येथूनच दिघोळे-कोकाटे संघर्षाला प्रारंभ झाला. याच काळात दिघोळे यांनी सरकारी कोट्यातून मिळालेल्या सदनिकेची चौकशी लावल्याचे समजते. त्यांनतर कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
पाच वर्षे दिघोळे-कोकाटे संघर्ष पेटतच राहिला. पुन्हा २००४च्या निवडणुकीत दिघोळे-कोकाटे आमने-सामने आले. दुसऱ्यांदा कोकाटे यांनी दिघोळे यांना विधानसभा निवडणुकीत २० हजारांच्या फरकाने पराभूत केले. त्यानंतर २००९ विधानसभा निवडणुकीत प्रकाश वाजे आणि कोकाटे यांच्यात यावेळी दिघोळे यांनी प्रकाश वाजे यांचे काम केले. मात्र, वाजे पराभूत झाले. सुमारे दोन दशके दिघोळे-कोकाटे संघर्ष सिन्नरकरांनी अनुभवला. त्यानंतर शेवटच्या काळात दिघोळे-कोकाटे यांच्यात गोडवा निर्माण झाला. २०१४च्या निवडणुकीत दिघोळे हे कोकाटे यांच्या व्यासपीठावर आले. तथापि, या निवडणुकीत कोकाटे पराभूत झाले आणि राजाभाऊ वाजे आमदार झाले. अगोदर विरोधक नंतर मैत्री पुन्हा दोन दशके जोरदार राजकीय संघर्ष आणि शेवटी गोडवा, असा दिघोळे-कोकाटे राजकीय जीवनपट सिन्नरकरांनी अनुभवला.
राज्यमंत्री असताना दिघोळेंचा पराभव
दिघोळे राज्यमंत्री असताना १९९९ मध्ये माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेला दंड थोपटले आणि शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी मिळवली. राज्यमंत्री दिघोळे यांना पहिली विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या कोकाटे यांनी सुमारे २० हजार मतांनी पराभूत केले. यावेळी सिन्नर तालुक्याला दिघोळे-कोकाटे यांच्यातील तीव्र संघर्ष अनुभवायला मिळाला. यावेळी नायगाव जिल्हा परिषद गटातूनही दिघोळे यांच्या पत्नी आशाताई दिघोळे यांना नायगाव गटातून पराभूत करण्यासाठी कोकाटे यांनी जंग जंग पछाडले व पराभूत केले.