सुरगाणा : तालुक्यात दुसऱ्यांदा उघडकीस आलेल्या बनावट नोटा प्रकरणातील एक जण लष्करातील नोकरी सोडून आला असल्याचे समजते. साधारण दीड महिन्यापूर्वी उंबरठाण परिसरातून गुजरात पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या संशयितांना अटक केली होती. या संशयितांनी गुजरातमधील वापी, धरमपूर परिसरात बनावट नोटा चलनात आणल्या होत्या. या घटनेस दीड महिना उलटत नाही तोच दुसरे रॅकेट उघडकीस आले आहे. यात सात जणांना अटक झाली आहे.
उंबरठाण येथे सहा सप्टेंबर रोजी एका भाजी विक्रेत्या महिलेला शंभर रुपयांची बनावट नोट दिली असता ती भाजी विक्रेत्यांनी ओळखली. यावेळी नागरिकांनी बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यास चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले होते. यामध्ये हरिश वाल्मिक गुजर (वय २९, रा. विंचूर रोड, येवला), बाबासाहेब भास्कर सैद (वय ३८, रा. चिंचोडी खुर्द, येवला), अक्षय उदयसिंग रजपूत (वय ३२, रा. येवला) यांना पोलिसांनी ताब्यात घेत तपासणी केली असता यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे आढळून आले. या तिघांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली आहे. यापैकी अक्षय राजपूतची कसून चौकशी केली असता त्याने अन्य चार साथीदारांची नावे सांगत संबंधित नोटा कुठे व कशा तयार होतात, याचा मुख्य सूत्रधार कोण, याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयित आरोपी प्रकाश रमेश पिंपळे (वय ३१, रा. येवला), राहुल चिंतामण बडोदे (वय २७, रा. चांदवड), आनंदा दौलत कुंभार्डे (वय ३५, रा. चांदवड), किरण बाळकृष्ण गिरमे (वय ४५, रा. विंचूर) यांच्याकडून ९ लाख ७८ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश बोडखे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, सपोनि. प्रभाकर सहारे, हेमंत भालेराव, पराग गोतुर्णे, गंगाधर ढुमसे, हेमंत भालेराव, संतोष गवळी करत आहेत.
------------------
दोघांना पोलीस कोठडी
चौघांपैकी प्रकाश पिंपळे व राहुल बडोदे यांची दि. १३ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, तर आनंदा कुंभार्डे व किरण गिरमे या दोघांना अधिक तपासाकरिता पोलीस कोठडी मिळाली आहे. विशेष म्हणजे आनंदा कुंभार्डे हा सैन्य दलातील नोकरी सोडून आलेला तरुण आहे, असे समजते, तर किरण गिरमे याचा सुमारे वीस वर्षांपासून विंचूर येथे प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू होता, असे समजते.
----------------------------------
सुरगाणा पोलिसांनी नकली नोटांचे रॅकेट उघडकीस आणून जप्त केलेल्या नकली नोटांसमवेत साहित्य. (१४ सुरगाणा नोटा १/२)
140921\14nsk_58_14092021_13.jpg~140921\14nsk_59_14092021_13.jpg
१४ सुरगाणा नोटा १~१४ सुरगाणा नोटा २