नाशिक : कोरोनाच्या प्रभावामुळे सर्वत्र निर्बंध असतानाही जिल्ह्याच्या ध्वजनिधी संकलनास नाशिककरांनी भरघोस योगदान दिले. जिल्ह्याला शासनाकडून ध्वजदिन निधी संकलनासाठी १ कोटी २९ लाख ४८ हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. १ कोटी, १० लाख ५० हजारांचा निधी संकलित झाला. निधी संकलनासाठी जास्तीत जास्त योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. दरम्यान, यावेळी शहीद जवानांच्या वारसांना जमिनीचा कब्जा देण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सूरज मांढरे होते. या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले, कल्याण संघटक मार्तंड दाभाडे यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
युद्धात शौर्यपदक प्राप्त शहीद जवानांच्या वारसांना शासनाच्या धोरणानुसार प्रतिकुटुंब पाच एकर जमीन देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण १० अर्जांपैकी तीन शहीद जवानांच्या वारसांना जमीन वाटपाचा मालकी कब्जा देण्यात आला आहे. जिल्ह्याला शासनाकडून ध्वजदिन निधी संकलनासाठी गेल्यावर्षी १ कोटी २९ लाख ४८ हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जगावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असतानाही जिल्ह्यातील सर्वच घटकांनी या निधीसाठी संकलन करून दिलेल्या उद्दिष्टांपैकी ८५ टक्के इतका निधी संकलित केला आहे. दिलेल्या उद्दिष्टांपैकी उर्वरित १५ टक्के उद्दिष्ट आपण लवकरच पूर्ण करू, असा विश्वास जिल्हाधिकारी मांढरे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात शहिदांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कमांडर ओंकार कपाले यांनी प्रास्ताविक केले.
---इन्फो--
सैनिक पाल्यांचा गौरव
आयटी क्षेत्रातील यशाबद्दल निशांत ज्ञानदेव खटाणे, प्रवीण शंकपाळ नारायण यांचा तर इयत्ता १० वीतील यशाबद्दल स्नेहा किरण बोरसे, स्नेहल प्रवीण सौंदाणे, सुहानी गोपाळ अहिरे, सूरज मंगेश पवार, अनुष्का भूषण शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला. बारावीतील गुणवंत म्हणून खुशाल दादाभाऊ सोनवणे , वैष्णवी राजाराम दळवी, हृषिकेश नरेश रेवंदीकर यांचा सत्कार झाला.