नाशिक : गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन भविष्यातील जलसंकट पाहता महापालिका प्रशासनाने अखेर पाणीप्रश्नी होत असलेले राजकारण झुगारून लावत आठवड्यातून एक दिवस विभागवार जलशुद्धीकरणनिहाय रोटेशननुसार पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पाणीकपातीसंबंधीचे वेळापत्रक जाहीर करत सर्वसंमतीनेच सदर निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले असून, त्याची अंमलबजावणी येत्या सोमवार दि. २२ फेबु्रवारीपासून केली जाणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पाणीकपातीवरून राजकारण पेटले होते. महापालिकेतील सत्ताधारी मनसे आघाडीसह शिवसेना, माकप यांनी गंगापूर धरणातील अत्यल्प पाणीसाठा पाहता १५ टक्के नियमित पाणीकपातीसह आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा आग्रह प्रशासनाकडे धरला होता तर भाजपाने त्यास विरोध दर्शविला होता. शहरातील तीनही भाजपा आमदारांनी वाढीव पाणी देण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे सांगत पाणीकपातीची गरज नसल्याची भूमिका घेतली होती. दुसरीकडे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मात्र ३१ जुलैपर्यंत पाणी पुरणार नसल्याचे सांगितले जात होते. या साऱ्या रस्सीखेचमध्ये पाणीकपातीचे नियोजन रखडले होते. दरम्यान, ११ फेबु्रवारीला जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून गंगापूर धरणातील आणखी ३०० दलघफू पाणीसाठा देण्याचे आणि पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे बंधन घातले होते. तत्पूर्वी, विभागीय आयुक्तांकडेही भाजपा आमदार, मनपा पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात बैठक होऊन आठवड्यातून संपूर्ण शहराचा एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याऐवजी जलशुद्धीकरणनिहाय विभागवार एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यास संमती दिली होती. अखेर महापालिका आयुक्तांनी गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन विभागीय आयुक्तांकडे झालेल्या बैठकीतील निर्णयाचा आधार घेत आठवड्यातून एक दिवस विभागवार रोटेशननुसार पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयानुसार, शहरातील शिवाजीनगर, बारा बंगला, पंचवटी व निलगिरी बाग, नाशिकरोड व गांधीनगर या जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत येणाऱ्या भागांमध्ये आठवड्यातील एक दिवस पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यात दर सोमवारी संपूर्ण सिडको परिसरात पाणी बंद राहणार, तर दर मंगळवारी सातपूर परिसर आणि नाशिक पश्चिम विभागातील पाणी बंद राहणार आहे. दर गुरुवारी संपूर्ण पंचवटी विभाग तर दर शुक्रवारी नाशिकरोड विभागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक पूर्व विभागातील पाणीपुरवठा मात्र भागनिहाय दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार असा बंद ठेवण्यात येणार आहे. आठवड्यातील शनिवार आणि रविवार तसेच बुधवार या दिवशी मात्र पाणीपुरवठा नियमित सुरू ठेवण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन करताना पुढील काही दिवसांत तांत्रिक अडचणी उद्भवल्यास त्यासंबंधी फेरआढावा घेऊन त्यावर उचित निर्णय घेण्याचा पर्याय राखून ठेवला आहे.
विभागवार एक दिवस पाणीपुरवठा बंद
By admin | Published: February 20, 2016 10:57 PM