शैलेश कर्पे सिन्नरखादी वस्त्र म्हटले की डोळ्यांसमोर येतात ती राजकीय नेतेमंडळी. मात्र यापुढे राज्य शासकीय-निमशासकीय अधिकारी व कर्मचारीही आठवड्यातील एक दिवस खादी वस्त्र असलेला पोषाख परिधान केलेले दिसून आल्यास नवल वाटू नये! शासनाने परिपत्रक काढून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दर सोमवारी खादी वस्त्र असलेला पोषाख परिधान करण्याच्या सूचना केल्या आहेत.खादी वस्त्र विक्रीत वाढ होऊन ग्रामीण भागात खादी वस्त्र उत्पादन करण्यात कारागिरांना सहाय्यभूत व्हावे तसेच खादी वापरास प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाने सदर निर्णय घेतला आहे. राज्यात शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तहसील कार्यालय, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या शासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालये या निमशासकीय कर्मचाऱ्यांना दर सोमवारी खादी वस्त्र परिधान करावे लागणार असल्याने सोमवार हा एक प्रकारे ‘खादी डे’ असणार आहे.अधिकारी व कर्मचाऱ्यांना खादी वस्त्र खरेदी करणे सुलभ व्हावे यासाठी जिल्ह्यातील दोन प्रमाणित खादी संस्थांची यादी शासनाच्या या परिपत्रकासोबत देण्यात आली आहे.
आठवड्यातील एक दिवस ‘खादी डे’
By admin | Published: October 16, 2016 12:50 AM