सिन्नर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सिन्नर महाविद्यालयात अत्याचारविरोधी कायदा २०१३ अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. प्राचार्य डॉ. जे. डी. सोनखासकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेस माता-पालक व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणाऱ्या छळास प्रतिबंध, मनाई आणि निवारणासाठी असलेल्या अत्याचारविरोधी कायदा २०१३ मधील तरतुदींची माहिती प्राचार्य सोनखासकर यांनी यावेळी दिली. अत्याचारविरोधी कायद्याअंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना करणे ही महाविद्यालयाची जबाबदारी आहे. त्यानुसार सिन्नर महाविद्यालयात तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली असून, त्यात अध्यक्ष, प्राध्यापक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी व एक समाजसेवक अशा नऊ सभासदांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. महाविद्यालय परिसरात झालेल्या अत्याचाराबद्दल या समितीकडे तक्रार दाखल करता येणार असल्याचे सोनखासकर म्हणाल्या. महाविद्यालयातील सर्व घटकांमध्ये अत्याचारविरोधी कायद्याविषयी जनजागृती करणे ही या समितीची जबाबदारी असल्याचे सोनखासकर यांनी स्पष्ट केले. घडलेल्या प्रसंगाची तक्रार समितीकडे नोंदवावी, लैंगिक छेडछाड गुन्हा आहे त्याकडे दुर्लक्ष करु नका, तुमचा सन्मान करणाऱ्या मुलांचा आदर करा, मुलींनी संरक्षण दुर्बलतेची जाहिरात करु नये, सहाय्य मागायला घाबरू नये, असे आवाहन सोनखासकर यांनी केले. महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष श्रीमती एस. के. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. जयश्री बागुल यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी अर्चना पगार, स्मिता शिंदे, रेणुका आचट, डॉ. सुरेखा जाधव आदी उपस्थित होत्या. (वार्ताहर)
सिन्नर महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा
By admin | Published: March 07, 2017 12:26 AM