येवला : शहरातील उघड्या गटारात पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागडदरवाजा परिसरात घडली असून, या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.सकाळी नागडदरवाजा परिसरातील नागरिकांना गटारात कोणीतरी पडल्याचा संशय आल्याने त्यांनी गटारात बघितले असता एकजण गटारात असल्याचे नागरिकांना दिसून आले. तत्काळ ही घटना शहर पोलिसांना कळविली. तोपर्यंत गटारात पडलेल्या इसमाला बाहेर काढण्यात आले. येवला शहरात तपास केला असता सदर इसम हा शहरात भंगार गोळा करणारा गंगाधर माणिक राऊत (५५) रा. जुने तहसीलमागे असल्याचे समजले. हा इसम पहाटेच्या सुमारास नागडदरवाजा परिसरात भंगार गोळा करण्यासाठी रोजच्या प्रमाणे निघाला, परंतु पालिकेच्या उघड्या गटारात पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. यामुळे नगरपालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. येवला शहर पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. शहरातील अनेक गटारींना कठडे नसल्याने या गटारांचे नाल्यात रूपांतर झाले आहे.याबाबत पालिका प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
येवल्यात उघड्या गटारात पडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 1:54 AM