नाशिक : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना सोमवारपासून शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात येणार असून पाचवी ते आठवी व नववी ते बारावीच्या वर्गांंमध्ये सर्व विषय शिकविले जाणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना उपस्थितीचे कोणतेही बंधन नसून विद्यार्थी पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन अथवा शाळेचा पर्याय निवडू शकणार असल्याचे शिक्षण उपसंचालक डॉ. नितीन उपासणी यांनी स्पष्ट केले आहे.
शालेय शिक्षण विभागाने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि कोरोनाचा ओसरता प्रभाव लक्षात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू केल्या. मात्र, शाळांमध्ये केवळ गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयांच्या तासिकांचे नियोजन करून याच विषयांचे शिक्षक उपस्थितीच्या सूचना होत्या. मात्र, आता सोमवार (दि.२२) पासून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत शंभर टक्के शिक्षकांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये पाचवी ते बारावीच्या वर्गांमध्ये सर्व विषय शिकविले जाणार आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या प्रभावामुळे विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद करण्यात येत असताना नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसादही वाढत आहे. हीच गोष्ट विचारात घेऊन शिक्षण विभागाने सोमवारपासून शाळांमध्ये शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण उपसंचालक डॉ. नितीन उपासणी यांनी दिली आहे. यापूर्वी ४ जानेवारीपासून शहरासह जिल्हाभरात सुरू करण्यात आलेल्या नववी ते बारावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने पाचवी ते आठवीच्या शाळा १७ जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या असून विद्यार्थी व शिक्षक सुरक्षितता असल्याने शैक्षणिक वातावरण पूर्ववत करण्याच्या दिशेना जिल्ह्यात प्रयत्न सुरू आहेत.
पॉईंटर-
जिल्ह्यातील विद्यार्थीसंख्या
पाचवी - १,२२,७४३
सहावी - १,२०,६४५
सातवी - १,१८,३३२
आठवी - १,१५,९१०
नववी - १,११,४२१
दहावी - ९८,९५९
अकरावी - ६८,१६०
बारावी - ६७,९१८
जिल्ह्यातील शाळा - ५६२६
जिल्ह्यातील शिक्षक -१२, ३२४
इन्फो-
पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झालेल्या शाळांमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता शिक्षण विभागाने सर्वच विषयांच्या तासिका सुरू करण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी पाचवी ते बारावीच्या सर्व शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे प्रामुख्याने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत मिळणार आहे.