महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नसल्याने मनपा कर्मचाऱ्यांवर कामकाजाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. यासाठी महापौर सतीश कुलकर्णी व अन्य पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे पाठपुरावा केल्याने अखेरीस ४ जानेवारीपासून पदोन्नती समितीच्या बैठकांना प्रारंभ झाला आहे. २१ जानेवारीपर्यंत या बैठका चालणार आहेत. विशेष म्हणजे महापौर कुलकर्णी यांनी आयुक्त कैलास जाधव यांना लेखी पत्र देऊन सेवाज्येष्ठता तपासून शंभर टक्के पद्धतीने पदोन्नती देण्यास सूचित केले आहे. त्यानुसार कार्यवाही देण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
महापालिकेत २०१३ मध्ये कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर नाशिक महापालिकेचा ब संवर्गात समावेश झाल्याने रिक्त पदाची संख्यादेखील वाढली आहे. सध्या दीड ते दोन हजार संवर्गातील पदे रिक्त आहेत.
इन्फो...
महापालिकेत दर महिन्याला अनेक अधिकारी - कर्मचारी निवृत्त होत आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीदेखील पत्करली आहे. त्यातच नव्याने भरतीसाठी परवानगी शासन देत नाही आणि उपायुक्तांसारखी अनेक पदेही शासनाकडून प्रतिनियुक्तीवर भरण्यात येत असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत अस्वस्थता आहे. आता शंभर टक्के पदोन्नतीच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.